कराड नगरपरिषदेच्यावतीने शहरात मतदान जनजागृती
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
“वृद्ध असो की जवान अवश्य करा मतदान”, “आपल्या मतामुळे लोकशाहीचा होणार सन्मान …अवश्य करा मतदान” अशा घोषणा देत कराड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्याकडून शहरात मतदारांमध्ये 45 सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृती करण्यात आली. दरम्यान , यावेळी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याची शपथ घेण्यात आली.
45 सातारा लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मतदारांमध्ये जागृती करण्यात येत आहे. कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी कराड शहरात नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्याकडून पायी पदयात्रा काढून शहरातील मतदारांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी “आपल्या मतामुळे होणार लोकशाहीचा सन्मान ..अवश्य करा मतदान” अशा प्रकारच्या विविध घोषणा देत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यानंतर मतदान करण्यासंदर्भात सामुदायिक शपथ घेण्यात आली.
कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान हे कर्तव्य समजून करण्याचा यावेळी निश्चय करण्यात आला. या उपक्रमात नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.