कराड-पाटणसाठी मायक्रो प्लॅन ठरलाय ; छ. उदयनराजेंचा गौप्यस्फोट
'कारण' असेल म्हणूनच 'राज' यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याचे सुतोवाच
चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
राजेंद्रसिंह यादव, विक्रम पावस्कर , अतुल भोसले यांच्या माध्यमातून आपण आजपर्यंत कराडकरांच्या संपर्कात आहोत. कराड नगरपालिकेला आपण आवश्यक असेल ते सहकार्य केले आहे. हे खरं आहे की सातारा लोकसभा मतदारसंघात कराड आणि पाटण तालुक्यात 55 टक्के मतदान आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांसाठी महायुतीचा मायक्रो प्लॅन ठरला आहे, असा गौप्यस्फोट छ. उदयनराजे भोसले यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी व प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अतुल भोसले, माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भरत पाटील, सुनील काटकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, भाजपचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, कराड-पाटण साठी आम्ही महायुतीचा मायक्रो प्लॅन तयार केला आहे. मात्र पत्रकारांना तो सांगितला तर मग तो प्लॅन कसला. निवडणूक झाल्यानंतर मी त्याबाबत पत्रकारांना व्यवस्थित सांगेन. काँग्रेस आणि भाजपच्या कामकाजात फरक आहे. काँग्रेसच्या काळात फार ऊतमात झाला, पश्चिम महाराष्ट्र तर काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. दगडाला शेंदूर फासला तरी त्याला आम्ही निवडून आणू, असे त्यावेळी काँग्रेसचे नेते सांगत असत. म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवायचे राहिले बाजूला पण ते लोकांना गृहीत धरत असत. असंच काहीतरी कारण असेल त्यामुळेच माझे मित्र राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे.
काँग्रेसला खरोखरच या भागाचे प्रश्न सोडवायचे असते तर ४० ते ४५ वर्षे जलसिंचनाचे प्रकल्प त्यांनी रखडत ठेवले नसते. काँग्रेसच्या काळातच कार्यकर्त्यांना उसाची उपलब्धता न बघता खिरापत वाटल्यासारखे साखर कारखान्यांचे परवाने वाटले गेले, त्यामुळे पुढे जावून आज साखर कारखानदारीचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काँग्रेसला शेतकऱ्यांचा विकास करायचा होता तर कृष्णा खोरेसारखे महत्त्वकांक्षी प्रकल्प त्यांनी का पूर्ण केले नाहीत? असा सवाल करून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले, आपण कोणत्याही जातीच्या किंवा समाज घटकाच्या विरोधात नाही. पण जातनिहाय जनगणना झाली असती तर अनेक प्रश्न सुटले असते. शासन सर्वांना नोकऱ्या देऊ शकत नाही मात्र शिक्षणाच्या बाबतीत काही सवलती तरी नक्की देऊ शकते. मराठा समाजातील काही महिला तर धुणीभांडी करायला जातात, मुलाला कॉलेजला पाठवायचे म्हटले तर त्यांच्याजवळ पैसे नसतात, मग त्यांनी आरक्षण मागितले तर त्यात काही गैर नाही.
शासनाने भविष्यात कराड जिल्हा करण्याचे प्रस्तावित केले तर त्याला तुमचा पाठिंबा असेल का विरोध असेल, या प्रश्नावर बोलताना उदयनराजे म्हणाले, समस्त कराडकरांचे त्यामध्ये हित असेल तर माझा विरोध असण्याचे काही कारण नाही.
तुम्ही राज्यसभेचे खासदार म्हणून बोलत आहात की लोकसभेचे महायुतीचे उमेदवार म्हणून बोलत आहात ? कारण तुम्हाला अजून उमेदवारी मिळालेली नाही? जर नाही मिळाली तर अपक्ष लढणार का? पत्रकारांच्या या प्रश्नाला उदयनराजे यांनी थेट उलट प्रश्न करत , मला उमेदवारी मिळणार नाही हे तुम्हाला कशावरून वाटते? असे उलट विचारत पत्रकारांची फिरकी घेतली. मी राज्यसभेचा खासदार म्हणून नव्हे तर लोकसभेचा उमेदवार म्हणूनच तुमच्याशी बोलतोय, असं म्हणत , लग्न मोठं असेल तर यादी व्हायला वेळ लागतो हे लक्षात घ्या. चर्चेतून जे घडते ते चांगले घडते, असे सूचक वक्तव्य केले.
राजकारण हे दोन प्रकारचे असते. एक सकारात्मक राजकारण आणि दुसरे नकारात्मक राजकारण. दुसऱ्यावर टीका करायची आणि मते मिळवायची याला नकारात्मक राजकारण म्हणतात. हे आपण आजवर कधीही केले नाही. मी सकारात्मक राजकारणी आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
तिसऱ्याची दांडी उडवायची आम्ही बघतोय…
महायुतीच्या कराड मधील मेळाव्याला राष्ट्रवादी गटाच्या नेत्यांनी दांडी मारली होती का? या पत्रकारांच्या प्रश्नावर उदयनराजे हसत हसत म्हणाले, दांडी… दांडी कोणी मारली नाही… तुम्ही काळजी करू नका. मकरंद पाटील यांना मुंबईला काम होते त्यामुळे ते मुंबईला गेले होते. आता आम्ही सर्वजण मिळून तिसऱ्याची दांडी कशी उडवायची ते बघतोय..!