आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक कायदा व सुव्यवस्थेत व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणुकीच्या सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा. भारत निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आदर्श आचारसंहिता कामकाजाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, विविध समित्यांचे नोडल अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, आचारसंहिता सुरु होताच भरारी पथकांचा प्रभावी वापर आवश्यक आहे. त्या अनुषंगाने एसएसटी, एफएसटी, अशी सर्व भरारी पथके तात्काळ कार्यान्वित करा, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्ट्रॉगरूमाला भेट द्यावी व त्याचा अहवाल द्यावा. इव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या हाताळणी संबंधात आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी. 19 मार्च रोजी रॅण्डमायझेशनची प्रकीया करण्यात येणार असून संपूर्ण यंत्रणेला याबाबत सर्व अद्यावत प्रशिक्षण द्या. फॉर्म क्र.6,7 व 8 शी संबंधित सर्व प्रलंबितता त्वरीत निकाली काढा. व्होटर आयडी कार्डचे संपूर्ण वितरण करा. सर्व पोलिंग स्टेशन्सला सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन ती सुव्यवस्थित असल्याबाबत व आवश्यक त्या सर्व पायाभूत सूविधा उपलब्ध असल्याबाबत खात्री करा.
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणावर करावी असे सांगून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, सीव्हिजील अॅपचा प्रभावी वापर होणार असून, यावर आलेल्या तक्रारींवर त्वरीत कारवाई होणे बंधनकारक आहे. उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहितेच्या काळात चोख कारवाई करून नियमांचे उल्लंघन होणाऱ्या ठिकाणी कोणतीही ढिलाई न ठेवता सक्त कारवाई करावी.
या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी संवाद आराखडा, दळणवळण आराखडा, स्वीप उपक्रम, आदर्श मतदान केंद्र, मिडिया मॉनिटरींग समिती आदी सर्व समित्यांच्या कामकाजांचा आढावा घेतला. यावेळी शासकीय इमारती, होर्डींग्जवरील संदेश त्वरीत काढून घेण्यात यावेत. अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाईची मोहीम त्वरीत हाती घेण्यात यावी, सातारा जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाइी स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवावा, एखादी व्यक्ती अंथरुणावर खिळून असल्यास व 40 टक्यांपेक्षा जास्त असमर्थता असल्यास अशा नागरिकांना पोस्टल मतदानाची सुविधा मिळेल याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.