उड्डाणपुलासाठी उंब्रजला महामार्ग रोखला
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
उंब्रज ता. कराड येथील उड्डाण पुलाच्या मंजुरीसाठी प्रशासनाकडून दिरंगाई केली जात असून ठेकेदार दांडगाव्याने तारळी नदीवरील पुल पाडण्यासाठी घाईगडबड करत आहे. उड्डाणपुलाची मागणी करणाऱ्या स्थानिकांवरच दबाव तंत्र वापरले जात असून याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी १५ मार्च रोजी उंब्रज व पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थांनी एकत्र येवून महामार्ग रोखला. यामुळे कराड ते सातारा लेनवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान महामार्गाच्या दिशेने आलेल्या आंदोलकांना काही काळ पोलीसांनी रोखून धरल्याने तणाव जन्य परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलकांची उपविभागीय पोलीस अधिक्षक अमोल ठाकूर व इतर पोलीस अधिकाऱ्यांसमवेत उड्डाणपुलाच्या प्रश्नांवर चर्चा झाली त्यानंतर काही काळ महामार्ग रोखून धरण्यात आला. महामार्ग प्राधिकरण विभागाचे तत्सम अधिकारी व आंदोलकांची एकत्रित बैठक घडवून आणण्याचे आश्वासन उप अधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिल्याने दोन दिवसात या प्रश्नावर बैठक होणार आहे. त्यानंतर आंदोलकांची पुढील दिशा ठरणार आहे.
आंदोलकांत भाजप नेते मनोजदादा घोरपडे, सरपंच योगदाज जाधव, निवास थोरात यांच्यासह स्थानिक नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.