चांगभलं ऑनलाइन | पुणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बारामती लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणता उमेदवार देणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगली आहे. मात्र आता बारामती मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार असल्याचे समोर आले आहे. अजितदादा गटाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार याच बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असतील असं स्पष्ट सांगितलं आहे.
राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाची चांगलीच चर्चा सुरू आहे. याठिकाणी उमेदवार कोण असणार याबाबत तर्क लावण्यात येत आहेत. मात्र, या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्याचे कारण म्हणजे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुनिल तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर थेट भाष्य केलं आहे . सुनेत्रा पवार याच बारामती मतदारसंघाच्या उमेदवार असतील, असं तटकरे यांनी जाहीरपणे सांगितले आहे.
यामुळे बारामतीला आता नणंद विरूद्ध भावजय अशीच लढत फिक्स मानली जात असून दोन्ही उमेदवार सध्या मतदार संघात दौरे करताना दिसत आहेत. त्यासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी काल ‘शरद पवार यांचे राजकीय विरोधक’ अशी ओळख असलेल्या माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. त्यामुळे पवार यांच्याकडून प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात असल्याचे समोर आले आहे.
सुनेत्रा पवार यांनी अनंतराव थोपटे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. भोर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवार यांनी थोपटे कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच राहुल कुल यांच्या दौंड येथे देखील त्यांनी भेटीगाठी घेतल्या आहेत.
भाजपचे जिल्हाअध्यक्ष वासुदेव काळे यांच्या घरी देखील त्या गेल्या होत्या. सध्या बारामती मतदार संघात सुनेत्रा पवार यांचा भेटीगाठींवर जोर आहे. यामुळे त्याच उमेदवार असणार हे फिक्स मानले जात आहे. त्याला तटकरे यांच्या वक्तव्याने बळकटी आली आहे.