कराडमध्ये गोंदवलेकर महाराजांचा जन्मोत्सव रामलल्लाच्या जयघोषात उत्साहात साजरा
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
गत पन्नास वर्षाची परंपरा असलेल्या येथील गोंदवलेकर महाराज उपासना मंडळाकडून प. पूज्य. श्नी. गोंदवलेकर महाराजांचा जन्मोत्सव बुधवारी रामलल्लाच्या जयघोषात आनंदमय व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
यावेळी परमपूज्य गोंदवलेकर महाराजांचे आराध्य दैवत श्री रामलल्लाच्या प्रतिमेची स्थापना व पूजा व्हि. के. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आली. आयोध्या येथील श्नी रामलल्लाच्या प्रतिमेसारखीच ही प्रतिमा व्हि. के. कुलकर्णी यांच्याकडून आणण्यात आली होती. हा कार्यक्रम नवीन कृष्णामाई मंगल कार्यालय येथे झाला. अनंत लाड यांनी उत्कृष्ट सजावट केली होती. रोहिणी साळवी व अश्विनी साळवी यांनी काढलेल्या सुरेख रांगोळीने अनेकांचे लक्ष वेधले. मंगळवारी दुपारी पादुका व देवतांचे पूजन व्ही के कुलकर्णी यांचे घरी संपन्न झाले. त्यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली. श्री रामलल्लांची प्रतिमा पालखी मिरवणुकीत सर्वात पुढे हातात धरून जयघोष करत मंडळातील सर्व साधक मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यानंतर नवीन कृष्णामाई मंगल कार्यालयात पूजन व आरती झाली. गणेश पारगावकरांचा भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला.
बुधवारी श्रींच्या पादुकांचे पूजन व लघु रुद्राभिषेक करण्यात आला. सकाळी पाचच्या सुमारास रामनाथ रामचंद्र अय्यर (मुंबई) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. अवधूत पारगावकर यांनी तबला साथ तर श्रीधर घळसासी यांनी हार्मोनियमवर साथ केली. पाळणा सेवा पूजा उमराणी व लता वाघ यांनी केली. संजय पाठक व सहकाऱ्यांनी पादुकावर लघुरुद्र पूजा केली. विष्णू सहस्त्रनाम भजन सेवा पूजा उमराणी वेदांत अनंत लाड यांनी केली. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. शीला कुलकर्णी यांनी केले. स्वाती पंडित यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. हजारो साधकांच्या उपस्थितीत महापूजा व आरती झाली. सुमारे तीन हजारावर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दोन दिवस सलग अखंड नामस्मरण झाले. मंडळाचे अध्यक्ष व्ही के कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प. पूज्य. गोंदवलेकर महाराजांनी दिलेली रामनाम व अन्नदान ही तत्वे जपत मंडळातील सर्व साधकांनी अथक परिश्रम करून उत्सव उत्तमरीत्या साजरा केला.