चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने पाटण व कराड तालुक्यातील आणखी सहा गावात फोरजी मोबाईल टॉवरला मान्यता मिळाली आहे. सुमारे ५ कोटी १० लक्ष रूपये निधीच्या या टॉवरमुळे स्थानिक परिसरातील मोबाईल नेटवर्कचा प्रश्न कायमचा संपुष्टात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात विस्कळीत झालेली बीएसएनएल सेवा सुरळीत करण्यासाठी खा.श्रीनिवास पाटील यांनी यापूर्वी लोकसभेत आवाज उठवला होता. त्यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे आत्तापर्यंत जवळपास १०१ फोरजी मोबाईल टॉवर मंजूर झाले आहेत. असे टॉवर मंजूर झाल्याने सुमारे दोनशे हून अधिक व वंचित असणार्या गावांना त्याचा फायदा होणार आहे. आता आणखीन पाटण आणि कराड तालुक्यातील ६ टॉवरला मंजूरी मिळाली आहे.
तालुक्याच्या दुर्गम भागातील मोबाईल कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी पाटण तालुक्यातील डफळवाडी (जळव), घाणबी, काहीर, निवी तसेच कराड तालुक्यातील खोडजाईवाडी व भरेवाडी या गावात टॉवर मंजूर झालेले आहेत. तर आणखीन टॉवर टप्याटप्याने मंजूर होणार आहेत, अशी मीहिती खा.श्रीनिवास पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
सातारा जिल्हा हा डोंगररांगामध्ये विखुरला गेला आहे. आजच्या इंटरनेट युगात येथील बीएसएनएलचे नेटवर्क पिछाडीवर पडले आहे. दुर्गम आणि डोंगरी भागात बीएसएनएलची सेवा तेवढी प्रभावीपणे मिळत नाही. त्यामुळे आवश्यक बनलेल्या मोबाईल सेवेअभावी स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सातारा जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पहाता मोबाईल टॉवरची गरज लक्षात घेऊन खा.श्रीनिवास पाटील हे बीएसएनएल टॉवर मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.