इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टरकडून दहा हजाराची लाच स्वीकारताना विद्युत वितरण कंपनीचा उपकार्यकारी अभियंता रंगेहात सापळ्यात
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
इलेक्ट्रिक पोल व विद्युत कनेक्शन बसवून देण्याच्या कामास मंजुरी देण्याकरिता तक्रारदार इलेक्ट्रिक रजिस्टर कॉन्ट्रैक्टरकडे 11 हजारांची लाच मागून त्यामधील तडजोडीत 10 हजाराची लाच घेताना म. रा. विद्युत वितरण कंपनीचा कोरेगाव येथील उपकार्यकारी अभियंता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडला.
मदन रामदास कडाळे वय ४६ वर्ष, उप कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि. कंपनी मर्या. उपविभाग कोरेगाव, वर्ग-२ सध्या रा. पादय कॉलनी, तामजाईनगर सातारा मुळ रा. मु.पो. कुरुंदवाड ता. शिरोळ जि. कोल्हापूर असे त्याचे नाव आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी, तक्रारदार हे इलेक्ट्रिक रजिस्टर कॉन्ट्रैक्टर आहेत. त्यांची जे. के. इलेक्ट्रोकल नावाची फर्म असून त्या मार्फतीने ते इलेक्ट्रीक पोल व विद्युत कनेक्शन बसवून देण्याची कामे घेत असतात. त्या प्रमाणे त्यांनी घेतलेल्या तीन कामांपैकी सुरुवातीच्या कामाचे व नव्याने जमा केलेल्या दोन कामांची मंजुरी देणे करीता ११ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रुपये लाच स्वीकारताना संशयित उपकार्यकारी अभियंता मदन कडाळे हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहाथ सापडला. ही कारवाई 20 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग साताऱ्याचे पोलीस उप अधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम पवार , सचिन राऊत, सहा. फो. शंकर सावंत, पो.हवा. नितीन गोगावले, पो हवा. निलेश राजपुरे, पो. कॉ. विक्रम कणसे, पो. कॉ. तुषार भोसले, पो. कॉ. निलेश येवले, चालक पो. हवा. मारुती अडागळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.