कराड दक्षिणमधील विद्यार्थ्यांना डाॅ. अतुलबाबा भोसले यांच्या माध्यमातून शैक्षणिक ॲपचे मोफत वितरण
सहज शिक्षा लर्निंग ॲप विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त : डॉ. अतुलबाबा भोसले
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला अनुसरून, मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ व्हावी, यासाठी सहज शिक्षा लर्निंग ॲप्लिकेशन बनविण्यात आले आहे. हे शैक्षणिक ॲप उपयुक्त असून, विद्यार्थी घडविणे हा एकमेव उद्देश ठेऊन कराड दक्षिणमधील हजारो विद्यार्थ्यांना या ॲपचे जास्तीत जास्त वितरण केले जाईल, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली. कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृह (टाऊन हॉल) येथे आयोजित विद्यार्थी – पालक स्नेहमेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी शिक्षणाधिकारी भानुदास हुलवान होते.
व्यासपीठावर कराडच्या माजी नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. स्वाती पिसाळ, तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, माजी नगरसेवक सुहास जगताप, घनश्याम पेंढारकर, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ. सारिका गावडे, मुकुंद चरेगावकर, ॲड. दीपक थोरात, नितीन वास्के, सहज शिक्षा लर्निंग ॲपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल अमलापूरकर, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक गिरीश शहा, बाळासाहेब साळुंखे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. भोसले यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना सहज शिक्षा लर्निंग ॲपचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच उपस्थित विद्यार्थी व पालकांच्या मोबाईलवर ॲप इन्स्टॉल करुन देण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, पारंपारिक शिक्षणाला डिजीटल माध्यमाची जोड मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. या ॲप्लिकेशनच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना घरच्याघरी अभ्यासाची उजळणी, सराव प्रश्नपत्रिका, तज्ज्ञांचे नियमित मार्गदर्शन मिळणार आहे. कराड दक्षिणमधील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना या शैक्षणिक ॲपचे वितरण केले जात आहे. भविष्यात गरज भासेल त्याप्रमाणे यात वाढ करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी भानुदास हुलवान यांनीही मार्गदर्शन केले. सहज शिक्षा लर्निंग ॲपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल अमलापूरकर यांनी ॲपबद्दल सविस्तर माहिती दिली. शिक्षक आघाडीचे संयोजक सतीश चव्हाण यांनी स्वागत केले. प्राची कोरे व मेघना शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सुजाता बर्गे यांनी प्रास्तविक केले. अमोल हुलवान यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.