चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, प्रगतीची मशाल गावोगावी पेटवणारे, डोंगर दऱ्या-खोऱ्यातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे व्यक्तीमत्व प्रविण काकडे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे.
नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य – अखिल भारतीय धनगर समाज महासंघ म्हणून प्रविण काकडे यांनी केलेले काम स्तुत्य आहे. त्यांचा सर्व भारतीय धनगर समाज महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश आहे.
2024 ते 2026 या वर्षासाठी पुन्हा महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय धनगर समाज महासंघाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रविण काकडे हे सदैव प्रयत्नशील राहतील , अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. तसेच काकडे यांनी लवकरात लवकर महाराष्ट्र राज्याच्या राज्य कार्यकारिणी आणि जिल्हा प्रमुखांची नियुक्ती करावी. धनगर महापुरुष / होळकर राजांचा गौरवशाली इतिहास (श्रीमंत मल्हारराव होळकर महाराज, लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर, क्रांतिवीर यशवंतराव होळकर (पहिला)) यांचा इतिहास महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योगदान द्यावे. याशिवाय धनगर समाजाला त्यांचे संवैधानिक हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
या जबाबदाऱ्या प्रविण काकडे हे यशस्वीपणे पार पाडतील आणि प्रत्येक धनगर कुटुंबाला अखिल भारतीय धनगर समाज महासंघाशी जोडण्यात यशस्वी होतील , अशा विश्वास संघटनेकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, फेरनिवडीबद्दल प्रवीण काकडे यांचे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
ज्ञान, विद्या, संस्कार यासाठी पुढाकार….
प्रविण काकडे हे कराड तालुक्यातील धोंडेवाडी गावचे सुपुत्र आहेत. आजवर त्यांनी धनगर महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील धनगर वाड्यात जाऊन ज्ञान विद्या आणि संस्कार यासाठी मौलिक प्रयत्न केले आहेत. धनगर कुटुंबातील मुला मुलींना शैक्षणिक साहित्याची मदत, आपतग्रस्तांना मदत, गुणवंतांचा गुणगौरव, ज्येष्ठांचा सन्मान आदी विविध उपक्रम राबवले आहेत. धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे, यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आजवर प्रवीण काकडे यांनी यथोचित प्रयत्न केले आहेत.
धनगर समाजाला संवैधानिक हक्क मिळवून देण्याचा ध्यास…
धनगर समाजाला शासनाकडून आवश्यक त्या सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी, घरकुलांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व शाळा प्रवेशाच्या अडचणी, नोकरदारांचे प्रश्न आणि धनगर आरक्षण यासाठी प्रवीण काकडे यांनी वेळोवेळी परखड भूमिका घेतली आहे. समाजाच्यावतीने सुरू असलेल्या उपोषण, आंदोलनास त्यांनी ठीकठिकाणी जाऊन पाठिंबा दिला आहे.