आ. अनिल बाबर यांचे निधन, सांगलीतील रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास
चांगभलं ऑनलाइन | विटा प्रतिनिधी
सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे. अनिल बाबर यांना न्यूमोनियाचा त्रास होऊ लागला होता, प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटलांचा अनिल बाबर यांनी २०१९ ला पराभव केला होता. अनिल बाबर यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असा राजकीय प्रवास झाला आहे. शिवसेना फूटून एकनाथ शिंदे गट वेगळा झाल्यानंतर आ. अनिल बाबर यांनी महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या शिंदे गटाला साथ दिली. ते गुवाहाटीमध्येही एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांमध्ये सहभागी होते.
ठाकरे गटाकडून ज्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुढे करण्यात आला, त्यामध्ये अनिल बाबर यांच्याही नावाचा समावेश होता. 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवारी करताना अनिल बाबर यांनी अपक्ष सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. ते चार टर्म आमदार होते. टेंभूचे पाणी दुष्काळी खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत तालुक्यात पोहचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.
दरम्यान, आ. अनिल बाबर यांच्या निधनामुळे त्यांचे मूळ गाव गार्डीसह विटा शहर व खानापूर – आटपाडी मतदार संघ आणि सांगली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.