कराड तालुक्यातील ‘या’ शहीद जवानाला मिळाले होते मरणोपरान्त कीर्ती चक्र!
शहीद दिवस साजरा करून शौर्याला देण्यात आला उजाळा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
वडगाव हवेली गावचे सुपुत्र शहीद वीर जवान हवालदार मेजर शिवाजी बाळु जगताप हे 28 जानेवारी 1994 रोजी “ऑपरेशन रक्षक” या आतंकवादी विरोधी मोहिमे मध्ये जम्मू काश्मीर (कुपवाडा) येथे दोन आतंकवाद्यांना कंठ स्नान घालून देशासाठी शहीद झाले होते. ते 6 मराठा लाईट इनफन्ट्री मध्ये कार्यरत होते. त्यांना तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी मरणोपरान्त कीर्ती चक्र प्रदान करून त्यांच्या पराक्रमाचा भारत सरकारने गौरव केला होता. त्यांच्या या शौर्याला उजाळा देण्यासाठी महाराष्ट्र शासन अमृत वीर जवान अभियान समन्वय समितीच्यावतीने शहीद दिवस साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र शासन अमृत वीर जवान अभियान समन्वय समितीच्यावतीने माजी सैनिक, शहीद जवान, सेवारत सैनिक त्यांच्या कुटुंबाच्या समस्या सोडवने, सैनिक मेळावे आयोजित करणे, शहीद दिवस साजरे करणे हे स्तुत्य उपक्रम अमृत वीर जवान अभियान अंतर्गत राबविण्याचे धोरण शासनाने निश्चित केले आहे. त्यानुसार कराड तालुक्यात समिती व “सैनिक कक्ष” स्थापन करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासन अमृत वीर जवान अभियान समिती सचिव तहसीलदार विजय पवार यांनी प्रशासनाच्यावतीने शहीद वीर जवान हवालदार शिवाजी जगताप (कीर्तीचक्र सन्मानित) यांच्या समाधीस त्यांच्या शौर्य दिवशी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पंचायत समितीच्यावतीने श्री. सकपाळ , सैनिक फेडरेशनचेवतीने जिल्हा अध्यक्ष प्रशांत कदम, तालुका अध्यक्ष सदाशिव नागणे, चंद्रकांत साठे, सुनील मोरे, प्रकाश मसुगडे, मनोज चव्हाण, गावच्या वतीने सरपंच राजेंद्र जगताप, सी एस डी कॅन्टीनचेवतीने कमांडर दिग्विजय जाधव, मेस्को सेक्युरिटीच्यावतीने मोहिते, बळीराजा शेतकरी संघटनेचे शेवाळे, राहुल खडके, शहीद वीर पुत्र सुरज जगताप, तसेच मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी युथ फाउंडेशन शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सर्व क्षेत्रातील मान्यवर व तरुण वर्ग, आजी/माजी सैनिक संघटना अध्यक्ष-उपाध्यक्ष व सैनिक फेडरेशन पदाधिकारी, शहीद जवान कुटुंबीय, माजी सैनिक, एन सी सी कॅडेट,शेतकरी वर्ग , ग्रामस्थ, देशप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.