चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
‘ईव्हीएम हटाव देश बचाव,” “ईव्हीएम हटाव, संविधान बचाव”, असा नारा देत आज सर्वपक्षीय संघटनांनी व सामाजिक संघटनांनी कराडमध्ये एल्गार पुकारला. यावेळी सर्व पक्षीय संघटनांच्यावतीने ईव्हीएम रद्द करून त्याऐवजी मतदान पत्रिकेवर मतदान घ्यावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन राष्ट्रपती यांच्या नावे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी सर्वपक्षीय संघटनांच्यावतीने नवीन प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात आली. व्ही आर. थोरवडे म्हणाले, ईव्हीएममुळे आज निवडणूक प्रक्रिया संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावयाची असेल तर ईव्हीएम यंत्राद्वारे घेतले जाणारी मतदान प्रक्रिया बंद करून त्याऐवजी मतदान पत्रिकेवरूनच मतदान घेण्यात यावे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता कायम राहील आणि लोकांना योग्य मतदानाचा हक्क बजावता येईल.
भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे म्हणाले, ईव्हीएमद्वारे मत दिल्यानंतर आमचे मत चोरीला जात आहे. त्यामुळे ईव्हीएम यंत्राद्वारे घेतल्या जाणाऱ्या मतदानाला देशातील नागरिकांचा विरोध आहे. कराडमध्ये ही ईव्हीएमचे प्रात्यक्षिक करण्यास आलेल्या यंत्रणेला आम्ही जाब विचारला होता. ईव्हीएम द्वारे मतदान घेऊ नये, त्याऐवजी बॅलेट पेपर वरूनच मतदान घेतले जावे अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आज कराड मधील सर्व पक्षांच्यावतीने राष्ट्रपती महोदयांना निवेदन दिले आहे. याबाबत बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने दिल्ली येथेही मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारने यापुढे ईव्हीएमवर मतदान घेतल्यास ईव्हीएम मशीन फोडले जाईल, असा इशाराही आनंदराव लादे यांनी यावेळी दिला. या आंदोलनात राष्ट्रीय काँग्रेस पक्षासह विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.