चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
“मातंग समाजाच्या प्रश्नाच्या अनुषंगाने महायुती सरकार हे सकारात्मक असून या समाजाचे कोणतेही प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत” अशा पद्धतीची ग्वाही महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी आज येथे दलित महासंघाच्या निर्धार मेळाव्यामध्ये बोलताना दिली.
यावेळी मेळाव्याचे उद्घाटक म्हणून बोलताना ना. शंभुराजे देसाई म्हणाले की, ” मातंग समाजाचे अनेक प्रश्न आहेत. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळवून देणे, अण्णा भाऊ साठे महामंडळ गतीने चालविणे, अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देणे, बार्टी प्रमाणेच मातंग समाजासाठी स्वतंत्र आर्टीची स्थापना करणे, यासारखे मातंग समाजाचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाच्या अनुषंगाने फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबईत मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सोबत एक बैठक करण्यात येईल आणि त्या बैठकीमध्ये मातंग समाजा बरोबरच इतरही उपेक्षित समाजाच्या दृष्टीने त्यांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने एक “मास्टर प्लॅन” तयार करण्यात येईल” अशा पद्धतीचे आश्वासन ना.शंभूराज देसाई यांनी दिले.
यशवंतराव चव्हाण स्मृति सदन, कराड येथे दलित महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यामध्ये उद्घाटक म्हणून ना . देसाई बोलत होते. दलित महासंघ व बहुजन समता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले की, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे भारतामध्ये “अमृत काल” सुरू आहे असे वारंवार सांगतात. विकासाचा हा अमृत काल जरी दिसत असला तरी तो उपेक्षित समाजापर्यंत कधी पोहोचणार ? हा प्रश्न आहे. हजारो वर्षापासून दलित समाजावर अन्याय, अत्याचार होत आहेत. जातीयतेच्या व गुलामगिरीच्या बेड्या आजही या समाजाच्या हातामध्ये आहेत. या दलितांच्या – आदिवासींच्या हातातील साखळदंड तोडण्यासाठी शंभूराजे देसाई साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि दलितांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा करावा” अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी सरकारकडे केली.
सदर निर्धार मेळाव्यामध्ये कराड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते राजेंद्र सिंह यादव यांनीही आपले विचार मांडले. दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. पुष्पलता सकटे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. आदिवासी सेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीचे सदस्य मारुती वाडेकर आणि आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ दाभाडे यांनी केले तर स्वागत दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते यांनी केले. हरिभाऊ बल्लाळ यांनी आभार मानले तर प्राध्यापक दीपक तडाखे यांनी सूत्रसंचालन केले.
या मेळाव्यासाठी कराड, पाटण, वाळवा तसेच विटा या भागातून दलित महासंघाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थीत होते. सदर कार्यक्रमासाठी दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अजित दादा भोरे, सखाराम रणपिसे, बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट, सांगली जिल्हा अध्यक्ष विकास बल्लाळ, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे, प्रा.प्रकाश कांबळे, बहुजन समता पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष बळीराम रणदिवे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष पांडुरंग खिलारे, संग्राम सकट यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी कोल्हापूर जिल्हा दलित महासंघाच्या बहुजन समता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी विलास कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली. एकूणच दलित महासंघाचा हा निर्धार मेळावा मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये निर्धार मेळावा संपन्न झाला.
मास्टर प्लॅन तयार करू- शंभूराज
“मातंग समाजाच्या प्रश्नावर फेब्रुवारी महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक घेण्यात येईल व त्या ठिकाणी मातंग समाज व इतर उपेक्षित समाजाच्या विकासाच्या संदर्भात एक मास्टर प्लॅन तयार करण्यात येईल” असेही आश्वासन नामदार शंभूराज देसाई यांनी दिले.