चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्य, त्यावेळी झालेली फाळणी…चीन व पाकिस्तानशी झालेले युद्ध… खेळाडूंनी केलेली चमकदार कामगिरी अन् पंडित जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदी या पंतप्रधानांच्या कालखंडात झालेली देशाची प्रगती या सर्वांना उजाळा देत आबालवृद्धांना जुन्या आठवणीत घेऊन जाणारा ‘ये जो देस हे मेरा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी (ता. 20) सायंकाळी झाला. भारताची देदीप्यमान वाटचाल गायन व नृत्यातून उलगडून दाखविणारा हा कार्यक्रम कराडकरांसाठी एक आगळीवेगळी पर्वणीच ठरला.
भारताची देदीप्यमान वाटचाल गायन व नृत्यातून उलगडून दाखविणारा हा सांगितिक कार्यक्रम मिलिंद ओक दिग्दर्शित केला होता. या कार्यक्रमात ‘झी मराठी सारेगमप’ फेम गायक धवल चांदवडकर, चैतन्य कुलकर्णी, गायिका रसिका गानू, मालविका दीक्षित यांच्यासह कुणाल फडके, ऋतुजा इंगळे, अभिषेक हवरगी, रिया देसाई हे नृत्य कलावंत सहभागी झाले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित नेहरू व गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव करत भारत हमको जान से प्यारा है या गिताद्वारे त्यांच्या महान कार्यास उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हाॅकीमध्ये सन 1948 साली मिळालेले पहिले ऑलिम्पिक गोल्ड मेडल, आशियाई स्पर्धा खेळ आयोजन, भारतरत्न व पद्म पुरस्कार देण्याची झालेली सुरूवात याची झलक आकर्षक गितांसह नृत्याद्वारे सादर करण्यात आली.
याशिवाय मेरा जुता है जपानी, बंबई मेरी जान या गिताद्वारे चित्रपट सृष्टीतील मधुबाला, नर्गिस, देवानंद यांच्या कालखंडात कोहिनूर, चोरी चोरी, बरसात, श्री 420 , असली नकली, हम दोनो यास अन्य काही चित्रपटातील अजरामर गाणी सादर करण्यात आली. थोर शास्त्रज्ञ विक्रम साराभाई, डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या कार्याचा गौरव सदाबहार गीतांच्या माध्यमातून करण्यात आला. हिंदी चिनी भाई भाई म्हणत करण्यात आलेला विश्वासघात आणि त्यानंतर पाकिस्तानशी दोनदा झालेले युद्ध तसेच भारतीय जवानांचा पराक्रम ए मेरे वतन के लोगो या गाण्यासह नृत्यातून सादर करत कलाकारांनी उपस्थित लोकांची वाहवा मिळविली.
पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह सन 1990 पर्यंत वर्ल्ड कप क्रिकेटमधील विजेतेपद, सुप्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांचा उदय व गाजलेल्या चित्रपटांची गाणी सादर करत आणीबाणी, इंदिरा गांधी यांची झालेली हत्या, खलिस्तानी दहशतवाद, मुंबई बाॅम्बस्फोट या घटनांना उजाळा देण्यात आला.
दूरदर्शन आगमन रामायण, नुक्कड, ये है जो जिंदगी महाभारत या मालिकांसह भोपाळ गॅस दुर्घटना व त्यावर करण्यात आलेली मात आशाए खिले दिलसे…अब मुश्किल नही कुछ भी या गिताद्वारे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंतप्रधान मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांच्या कालखंडात आजवर झालेल्या प्रगतीसह ठळक गोष्टींना कोई कहे कहता रहे हमको भी दिवाणा यासारख्या गाण्यासह लक्षवेधी नृत्यातून दाखविण्यात आले. संसद हल्ला, कंदहार विमान अपहरण, मुंबई दहशतवादी हल्ला यासह संशोधन, अंतराळ क्षेत्रातील प्रगती व आजवरची देशाची थक्क करणारी वाटचाल गीत व नृत्याद्वारे सादर करण्यात आल्याने उपस्थित अबालवृद्ध अक्षरशः थक्क झाल्याचं दिसत होतं.
दैनिकांतील प्रसिद्ध बातम्या व व्हिडिओ लक्षवेधी…
देशाची जडणघडण संगीत व नृत्याद्वारे सादर करताना वेगवेगळ्या दैनिकात प्रसिद्ध बातम्या, फोटो व व्हिडिओ दाखविण्यात आल्याने या कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती. या बातम्या, व्हिडिओ व जुनी सुप्रसिद्ध अजरामर गितांसह नृत्यामुळे उपस्थित सर्वजण आपल्या बालपणीच्या आठवणीत हरविल्याची जाणीव पदोपदी होत होती.