कृषी क्षेत्रात पुढे कोणती आव्हाने ? तज्ञांनी सांगितलं असं
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सध्या कृषी क्षेत्रापुढे हवामान बदल व त्यातील विविधता, जमिनीची घटती उत्पादकता, आणि नैसर्गिक संसाधनांची कमतरता अशा अनेक आव्हाने व समस्या उभ्या आहेत. यातून उत्पादनवाढीसह शाश्वत शेती करायची असेल, तर त्याला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी अभियांत्रिकी विभागप्रमुख, संशोधक सल्लागार डॉ. सुनील गोरंटीवार यांनी केले.
कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या कृषी चर्चासत्रात ‘भविष्यातील शेती व डिजिटल तंत्रज्ञानाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
डॉ. गोरंटीवार म्हणाले, 30 वर्षांपूर्वी कृषी शास्त्रज्ञांनी हवामान बदलाबाबतचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. मात्र, आता त्याचे परिणाम प्रकर्षाने दिसू लागले आहेत. 50-60 वर्षांपूर्वी काळाची गरज म्हणून रासायनिक खते, संक्रमित बियाणे व पाण्याचा अतिवापर केल्यामुळे उत्पादन वाढले. परंतु, यामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे. पाणी प्रदूषित झाले असून पाण्याची कमतरताही जाणवू लागली आहे.
सध्याची वाढती लोकसंख्या, अन्नधान्याची वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी भविष्यकाळात सेंद्रिय व शाश्वत शेती करणे आवश्यक असून त्याला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज बनली आहे. यामध्ये सेन्सर, ड्रोन, स्वयंचलित यंत्रे व अवजारे, रिमोट सेन्सिंग, जीआयएस, जीपीएस, माहिती तंत्रज्ञान आणि मोबाईल ॲप्लिकेशन, तसेच सॅटेलाइटद्वारे कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणता येईल. डिजिटल तंत्रज्ञानाची क्षमता वापरून शेती केल्यास शाश्वत शेती केली जाऊ शकते. यासाठी माती, पीक, बियाणे, पाणी व खत व्यवस्थापन आवश्यक असून कार्बनचे कमी उत्सर्जन करण्यासाठी काही उपाययोजना करायला हव्यात. जमिनीतून सुमारे 18 टक्के कार्बन उत्सर्जित होतो. प्रत्येक शेती व पिकानुसार खत व पाण्याची गरज ओळखण्यासाठी शेतकऱ्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करायला हवा.
दुसऱ्या चर्चासत्रात ‘पॅकेजिंग इंडस्ट्रीवर’ विषयावर मार्गदर्शन करताना प्लास्टिक आणि पॅकेजिंग इंडस्ट्रीतील संशोधक, व्यवसायिक शैलेंद्र जयवंत म्हणाले, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी पॅकेजिंग इंडस्ट्री अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. विविध प्रकारच्या मालासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजिंग करणे आवश्यक असून आकर्षक पॅकेजिंगमुळे शेतमालाचा उठाव होण्यास व जास्त भाव मिळण्यास मदत होते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
ते म्हणाले, सध्या सर्वत्र मॉल संस्कृती रुजताना दिसते. यामध्ये शेतमाल व उपपदार्थांना जागा मिळवण्यासाठी नवीन पॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर करावा लागत आहे. पॅकेजिंगमध्ये काही गॅसेसचा वापर केला जातो. कडधान्य, विविध प्रकारची पावडर, ड्रायफूड अधिक चांगल्या प्रकारे पॅक करावे लागतात. यामध्ये बॉक्स, पाउच, बॅग, ड्रम आदी. प्रकार आहेत. उत्पादित क्षेत्र ते बाजारपेठ पर्यंतचे अंतर आणि वेळ याचा विचार करून पॅकेजिंग डिझाईन केली जातात. चांगले पॅकेजिंग नसेल, तर मालाला मॉलमध्ये जागा व योग्य भाव मिळत नाही. मॉलमधील वातानुकुलीत वातावरणाच्या दृष्टीने पॅकेजिंग वापरावे लागते. तसेच उष्णता, थंडी व आद्रतेनुसार पॅकेजिंगमध्ये बदल करावे लागतात. एकूणच शेतकरी व कृषी उद्योगाशी निवडीत व्यावसायिकांनी या तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करायला हवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.