चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
: लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील विविध साखर कारखान्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांसह अन्य मान्यवरांनी कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवात भेट देऊन पाहणी केली. यावेळी कृष्णा कृषी महोत्सव हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कृष्णा कृषी परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कृष्णा कृषी महोत्सवासाठी राज्यभरातील विविध साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या निमंत्रणाचा स्वीकार करत, आज लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, रेणा सहकारी साखर कारखाना, विलास सहकारी साखर कारखाना, जागृती शुगर्स, मारुती महाराज साखर कारखाना, ट्वेंटी वन शुगर्स साखर कारखान्यांसह लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती अशा संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक अशा एकूण ९३ मान्यवरांनी कृष्णा कृषी महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध स्टॉल्सना भेटी देऊन, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली.
कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या मान्यवरांचे स्वागत केले. ते म्हणाले, मांजरा परिवार हा देशातील सर्वोत्कृष्ट परिवार आहे. सहकारात जबाबदार पद्धतीने काम करणारे नेतेमंडळी या परिवारात आहेत. या परिवाराचे सर्वेसर्वा स्व. विलासराव देशमुख यांनी दीर्घकाळ राज्याचे नेतृत्व केले. त्यांनी सहकार क्षेत्रासाठी अनेक चांगले निर्णय घेतले. सध्या माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आ. अमित देशमुख आणि आ. धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्या भागात चांगले काम सुरू आहे.
यावेळी डॉ. भोसले यांच्या हस्ते लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्र्यंबक भिसे, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष श्रीशल्य उटगे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन आनंदराव देशमुख, विलास साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, जागृती शुगर्सचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष जगदीश बादणे, उपाध्यक्ष सुनील पडिले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, संचालक दिलीप पाटील, संभाजीराव सूळ, माजी व्हाईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाट, मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन गणपतराव बाजुळगे, मांजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय देशमुख, माजी नगराध्यक्ष चांदपाशा इनामदार, रामदास पवार, शिवाजीराव कांबळे, आबासाहेब पाटील, श्याम भोसले यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी आमदार त्र्यंबक भिसे म्हणाले, आमचा मराठवाडा हा कमी पर्जन्यमान असलेला भाग आहे. पण या भागाला स्व. विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यासारखे नेतृत्व लाभल्याने संपन्नता आली आहे. आपल्या भागात पाण्याच्या उपलब्धतेमुळे सुबत्ता लाभली असून, नदीत खळाळणारे पाणी पाहून आम्ही तृत्प झालो. भोसले कुटुंबाने शेतकऱ्यांना डोळ्यांसमोर ठेऊन या भागाचा केलेला विकास कौतुकास्पद आहे.
या सर्व मान्यवरांनी प्रारंभी प्रीतिसंगम घाटावर जाऊन लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन, त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनी प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. श्रीरंग देसाई यांनी आभार मानले.
दरम्यान, या मान्यवरांचे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येही जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले, सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कृष्णा कारखाना, कृष्णा बँकेसह कृष्णा परिवारातील विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.