कृषी आणि उद्योग हे हातात हात घालून चालू शकतात हे कृष्णा परिवाराने दाखवून दिले – changbhalanews
राजकियराज्यशेतीवाडी

कृषी आणि उद्योग हे हातात हात घालून चालू शकतात हे कृष्णा परिवाराने दाखवून दिले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार : कराडला कृष्णा कृषी आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
स्व. आप्पासाहेबांनी घालून दिलेला आदर्श जोपासण्याचे काम आप्पासाहेबांची तिसरी पिढी करत आहे. स्वर्गीय आप्पासाहेब यांच्या पश्चात डॉ. सुरेशबाबा यांनी त्यांच्या कार्याला एक आयाम दिला आणि त्याही पुढे जाऊन डॉ. अतुलबाबा भोसले हे आणखी एक नवा आयाम देत आहेत, हे या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी नुसतं पिकवून चालणार नाही तर पिकवलेलं विकलं पाहिजे हे सूत्र लक्षात घेऊन कृषी आणि उद्योग हे हातात हात घालून चालू शकतात, हे कृष्णा परिवाराने यानिमित्ताने दाखवून दिले आहे. हेच या परिवाराचे वैशिष्ट्य आहे, असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले. डॉ. अतुल भोसले हे राजकारणा पलीकडे जाऊन संवेदनशीलता जपणारे नेतृत्व आहे, असेही ना. फडणवीस यांनी सांगितले.

कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी दिमाखात झाले. याप्रसंगी ते बोलत होते. राज्यसभेचे खा. श्नी. उदयनराजे भोसले, आ. श्नी. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. नरेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते , भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले , विनायक भोसले, भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, माजी‌ आ. आनंदराव पाटील, विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, चित्रलेखा माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे आदी मान्यवर उपस्थित होते‌.

ही तर आयपीएलची टीम…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना उदयनराजे यांनी “रणजीची टीम”‘ असा केलेला उल्लेख अधोरेखित करत, ही रणजीची नव्हे आयपीएलचे टीम आहे आणि याचे मालक तुम्हीच आहात. तेंव्हा कोणाला आत ठेवायचे, कोणाला बाहेर ठेवायचे हे आता तुम्हीच ठरवायचे. फक्त आम्हाला बाहेर ठेवू नका म्हणजे झालं, असं म्हणत फडणवीस यांनी शाब्दिक कोटी केली. डॉ. अतुल भोसले यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या अद्यावतीकरणाच्या मागणीची दखल घेत व “उदयन महाराज यांचीही तशी आज्ञा आली असल्याने आम्हाला तर ऐकावेच लागेल असे म्हणत, लवकरच या स्टेडियमचा पूर्ण आराखडा तयार करून आधुनिक पद्धतीचे दर्जेदार स्टेडियम कराडकरांना उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन ना. फडणवीस यांनी यावेळी दिले.

आधुनिकतेबरोबर विषमुक्त शेतीची गरज….
ना. फडणवीस म्हणाले, डॉ. सुरेशबाबा यांनी सेंद्रिय शेतीचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. खरंतर या देशाचा पहिला वैज्ञानिक शेतकरीच होता. त्याने काळ्या मातीतून सोनं पिकवलं, शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती केली, त्यामुळे पूर्वी शेतकरी समृद्ध होता, पण गेल्या काही शतकात आपण रासायनिक शेतीकडे वळलो. त्यामुळे सुरूवातीला उत्पादकता वाढलीही पण नंतर त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागले. नैसर्गिक असतं तेच टिकाऊ असतं. इंजेक्शन देऊन झालेला पैलवान फार काळ टिकत नाही, तो लाल मातीतच तयार व्हावा लागतो तसंच हे आहे. त्यामुळे त्यामुळे आपल्याला नव्याने शेतीतले प्रयोग उत्पादकता शेतीतले विज्ञान समजून घ्यावे लागेल आज शेतीमधील समृद्ध राज्य म्हणून पंजाब कडे बघितलं जातं मात्र तेथेही क्षारपड जमिनीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. इस्त्राईल सारख्या देशात तंत्रज्ञानाचा उपयोग करून आवश्यक तेवढेच पाणी पिकांना दिलं जातं. त्यामुळे पाणी नसलेला देशही शेतीमध्ये समृद्ध बनला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ऊस शेतीच्या क्षेत्रातील नवीन वाण कसे तयार होतील, जास्तीत जास्त अंतर पिके कशी घेता येतील, कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी शेती कशी करता येईल याकडे आता लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच नुसते उत्पादन वाढवून चालणार नाही त्याचे मार्केटिंग ही आपल्याला करावी लागेल. कृष्णा परिवाराने कराडमध्ये आयोजित केलेला कृषी महोत्सव हा त्यामुळेच महत्त्वाचा आहे.

राज्यसरकारच्या योजनांचा शेतकऱ्यांना मोठा लाभ…
राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा सुरू केला त्याचा लाभ खरीप हंगामात जिल्ह्यातल्या 2 लाख 45 हजार शेतकऱ्यांना आणि रब्बी हंगामात 45 हजार शेतकऱ्यांना झाला आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. विम्याचे उर्वरीत अग्रीम ही आपण लवकरच देणार आहोत. नमो शेतकरी , मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला पेरणी यंत्र मागेल त्याला ड्रीप अशा योजना सरकारने आणल्या असून त्यासाठी वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. त्यानुसार थेट लाभ दिला जातो. शेतकऱ्यांना आता त्यासाठी रांगेत उभा राहावे लागत नाही. आत्तापर्यंत आलेल्या अशा अर्जांची निर्गती करण्यात आली आहे . उर्वरित अर्ज येत्या आर्थिक वर्षापूर्वी निकालात काढले जातील.

कृष्णा-कोयनेवरचे अर्धवट प्रकल्प पूर्ण केले…
आपल्या मागच्या सरकारच्या काळात ही आणि आत्ताच्या सरकारच्या काळात ही जलसिंचनाच्या योजनांना आपण मोठा निधी दिला असून कृष्णा आणि कोयनेचे अर्धवट राहिलेले जेवढे जेवढे प्रकल्प होते ते सर्व प्रकल्प आता पूर्ण केले आहेत. आमदार जयकुमार गोरे नेहमी जिहे-कटापूर योजनेवर बोलायचे, हा प्रकल्पही पूर्ण केला असून आता बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्याच्या योजना सरकारने अंमलात आणल्या आहेत‌. त्यामुळे पाण्याची बचत होत आहे. सरकार आता शेतीचे इलेक्ट्रिक फिडर सौरवर आणत आहे. या वर्षाअखेरपर्यंत 4 हजार फीडर सौरवर आणले जातील. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या 50 टक्के पैशांची बचत होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उपसा जलसिंचन योजनाही सोलरवर घेतल्या जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने साखर उद्योगाबाबत जेवढे काही निर्णय घेतले आहेत ते निर्णय सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावेत असेच आहेत. डॉ. सुरेशबाबांनी हे त्यांच्या भाषणात सांगितले आहेच मग ते एमएसपी असो की इथेनॉल असो, किंवा इन्कम टॅक्स रद्द करण्याचा निर्णय असो हे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करणारे निर्णय आहेत. त्यामुळे केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम असणारे सरकार आहे, असे नाव. फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईच्या रेड्यांचा बंदोबस्त करण्याचे काही तंत्र असेल तर आम्हाला शिकवा…

मला सांगण्यात आलं की या प्रदर्शनात 42 लाख रुपये किंमतीचा बैल आला आहे. इलेक्ट्रिक बैलही आहे , छोटी गाय ही आहे, तर दुसरीकडे आमच्या मुंबईमध्ये असे काही रेडे मोकाट सुटले आहेत. ते टीव्हीवर इतके बोलत असतात की त्यांचा बंदोबस्त करण्याचे काही तंत्र असेल तर आम्हाला शिकवा, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संजय राऊत व उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, डॉ. अतुल भोसले यांनी केलेली मागणी अतिशय योग्य आहे. कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे आधुनिकीकरण झाले पाहिजे, येथे रणजीची मॅच झाली पाहिजे आणि त्या टीमचे कॅप्टनपद डॉ. अतुलबाबा यांनी घ्यावे. त्यांनी कोणाला आत घ्यायचं , कोणाला बाहेर ठेवायचं हे ठरवावं.

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात जलसिंचनांच्या योजनांसाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी व त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तसेच स्वतः आपणही प्रयत्न केले. त्यामुळे आज हा भाग हिरवागार झाल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात पूर्वी दगडाला शेंदूर फासला तरी तो निवडून येईल असे म्हटले जात होते, त्यामध्ये अहंकार दिसून येत होता, पूर्वी हा कोणाचातरी बालेकिल्ला समजला जात होता पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही , असे खासदार उदयनराजे यांनी परखडपणे सांगितले.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, स्वर्गीय आप्पासाहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने कराडला कृष्णा साखर कारखान्याच्या माध्यमातून या भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्णा हा सहकारातील जिल्ह्यातील पहिला आणि राज्यातील पहिल्या चार मधला कारखाना असून सलग पंधरा वर्षे कारखान्याने राज्यात सर्वाधिक उच्चांकी दर देण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. जलसिंचन योजना , एसीटोन, इथेनॉल प्रकल्प असे प्रकल्प राबवणारा तो पहिला सहकारी कारखाना आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून कारखान्याने जैविक खत निर्मिती, सूक्ष्म अन्नद्रव्य निर्मिती असे प्रकल्प राबवले असून त्यामुळेच कारखान्याला शुगर इन्स्टिट्यूटकडून पाहिल्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. जलसिंचनाचे राज्यातील अनेक महत्वपूर्ण उपक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लागल्याचे सांगून साखर कारखानदारी वाचविण्याचे काम राज्य व केंद्र शासनाने केले आहे, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

प्रास्ताविकात डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराड आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावे, जागतिक पातळीवर होणारे संशोधन स्थानिक शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे आणि स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पादन जागतिक पातळीवर पोहचविण्याच्या दृष्टीने हा महोत्सव अत्यंत महत्वाचा आहे. केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, शेतीत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी अनेक उपक्रम राबवित आहेत. दुष्काळ मुक्तीसाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. त्यातूनच भूजल पातळीत वाढ झाली आहे. यावेळी त्यांनी कराड येथील क्रीडांगणात रणजी ट्रॉफीसारख्या स्पर्धा भरविण्यात येतील अशा दर्जाचे ते स्टेडियम करावे, अशी विनंती उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना केली.

प्रारंभी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व खा. उदयनराजे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी ना. फडणवीस यांचा सत्कार केला. व्हा. चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील यांनी स्वागत केले. शुअरशॉट इव्हेंटस्‌चे संदीप गिड्डे यांनी प्रदर्शनाचे नेटके नियोजन केल्याचे आवर्जून सांगण्यात आले.

कार्यक्रमास कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, निवासराव थोरात, वसंतराव शिंदे, दत्तात्रय देसाई, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, जितेंद्र पाटील, श्रीरंग देसाई, धोंडीराम जाधव व अन्य संचालक, जिल्हा कृषी अधिकारी सौ. भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, तसेच पोपट देसाई, अमोल गुरव, भाजपा तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, कराडचे माजी नगरसेवक सुहास जगताप, कृष्णा कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील, हर्षवर्धन मोहिते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close