बदलते तंत्रज्ञान पत्रकारांनी आत्मसात करण्याची गरज
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ; ज्येष्ठ पत्रकार गोरख तावरे यांचा पत्रकार दिनी सत्कार
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
आज देशातील पत्रकारितेसमोर राजकीय आव्हान उभे राहिले असून निर्भीड पत्रकारितेला मिळणारा वाव कमी झाला आहे. त्याचबरोबर प्रसार माध्यमांची आर्थिक स्वायत्तता व बदलत्या तंत्रज्ञानाचा धोकाही प्रसारमाध्यमांसमोर आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅटजीपीटी, डीपफेक या तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेसमोर मोठी आव्हाने उभी राहिली असून पत्रकारांनी बदलते तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे तरच त्यांचा नव्या युगामध्ये टिकाव लागेल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
येथील कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहामध्ये पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार गोरख तावरे यांची पुणे विभागीय अधीस्वीकृती समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ‘प्रसार माध्यमे : सद्यस्थिती’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी अध्यक्षस्थानी होते तर कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्राr जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या तासाभराच्या भाषणांमध्ये अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन करताना देशातील पत्रकारितेतील झालेले बदल तसेच प्रसारमाध्यमांसमोर निर्माण झालेली नवी आव्हाने विशद केली.
ते म्हणाले की, देशातील लोकशाही मजबूत करायची असेल तर प्रसारमाध्यमे महत्त्वाची आहेत. शासन व जनतेमधील दुवा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आज देशात प्रसारमाध्यमांसमोर दोन आव्हाने आहेत. प्रसारमाध्यमे स्वायत्तपणे, निर्भीडपणे काम करू शकतील, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात राजकीय संदर्भ, लोकशाही असे पैलू आहेत. जितक्या निर्भीडपणे समाजहिताचे प्रश्न माध्यमे मांडतील, तितकी लोकशाही मजबुत होईल, अशी त्यामागची संकल्पना आहे. दुसरा महत्वाचा विषय वेगाने वाढणाऱया तंत्रज्ञानामुळे पत्रकारांचे काय होणार, हा पैलू महत्वाचा आहे. तंत्रज्ञान व प्रसारमाध्यमांची आर्थिक स्वायत्तता यामुळे पत्रकारांच्या जीवनात आमुलाग्र बदल होणार आहेत.
भारतीय राज्यघटनेत अनेक स्वातंत्र्ये दिली आहेत. मात्र प्रसारमाध्यमांची स्वायत्तता असा शब्द घटनेत नाही. मुळातच भाषण स्वातंत्र्यातून प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आपण घेतले आहे. पूर्वी रेडिओ टीव्ही घेतला तर पोस्टातून ब्रॉडकास्ट लायसन काढावे लागत होते. त्याच्या महसुलातून आकाशावाणी, दूरदर्शन, ऑल इंडिया रेडिओ चालत होते. ते बंद झाल्यानंतर सरकारच्या मदतीवर शासकीय प्रसारमाध्यमे चालू लागली. देशात भारत सरकारचे स्वत:चे वृत्तपत्र नाही. बऱयाच देशात असते. वृत्तपत्रे ही खासगी लोकांनी चालवली आहेत. पूर्वी संपादक व मालक एकच असायचे. त्यानंतर मोठय़ा लोकांनी वृत्तपत्रे चालवायला घेतली. त्यातून विस्तार वाढला. खर्च वाढला. यातून जाहिरातीचे युग सुरू झाले. दूरदर्शननंतर खासगी वाहिन्यांना परवानगी दिली. त्यानंतर आज पर्यायी माध्यमे सुरू झाली आहेत. यामुळे वृत्तपत्रांची वाचकसंख्या कमी झाली असून कार्पोरेट युग प्रसारमाध्यमात सुरू झाले आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या वृत्तसमूहाचा उपयोग आपल्या उद्योगांच्या भरभराटीसाठी केला. पत्रकारितेतून कार्पोरेट इंट्रेस जपण्यात येत आहे. यामुळे प्रसारमाध्यमांच्या आर्थिक स्वायत्ततेचा प्रश्न निर्माण झाला. सगळी वृत्तपत्रे मोठमोठय़ा उद्योगपतींच्या दावणीला बांधली गेली आहेत. सरकारने यावर नियंत्रण ठेवायचे ठरवले तर आर्थिक स्वायत्तता नष्ट होणार आहे. येणाऱया लोकसभा निवडणुकांनंतर कशा प्रकारची लोकशाही शिल्लक राहिल, याची आज चिंता आहे. आजही देशात स्वायत्तपणे पत्रकारिता करत येत नाही. बीबीसीवरही देशात धाडी पडल्या. सरकारचे माध्यमांवर दडपण आले आहे. त्यामुळे भविष्यात फक्त पेड पीआर एजन्सीज शिल्लक राहतील का, असा प्रश्न आहे. लोकशाही टिकण्यासाठी प्रसारमाध्यमांचे अस्तित्व टिकले पाहिजे, असे ते म्हणाले.
डिजीटल युगानंतर व्हर्च्युअल रिऍलिटी येऊ लागली आहे. त्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान उभे राहिले आहे. चॅट जीपीटीमुळेही रोजगारवर परिणाम झाला आहे. डीप फेक तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे. या तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी होणार हे निश्चित आहे मात्र तो किती कमी होणार, याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. या सगळ्या स्पर्धेत टिकण्यासाठी पत्रकारांना तंत्रज्ञानाचे ज्ञान घ्यावे लागेल, असेही ते म्हणाले.
सुभाषराव जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात ज्ञान आणि विज्ञान अतिशय गतीने पुढे जात असून डिजिटलायजेशनमुळे बँकींग व्यवहार सोपे झाले असले तरी हॅकर्सचे धोकेही आहेत, असे सांगितले. पृथ्वीराज चव्हाण यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेले भाषण पत्रकारांसह समाजासाठी उद्बोधक असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. सुभाषराव एरम यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक सचिन शिंदे यांनी केले. प्रमोद सुकरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद तोडकर यांनी आभार मानले. ज्येष्ठ पत्रकार मुकुंद भट, सांगलीचे ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक चव्हाण, शशिकांत पाटील, संभाजी थोरात, वैभव पाटील, देवदास मुळे, सचिन देशमुख, अमोल चव्हाण, नितीन ढापरे, हेमंत पवार, विकास भोसले आदींनी स्वागत व सत्कार केले.
पत्रकारांची प्रत्यक्ष आवश्यकता भासणारच पण…
आजच्या प्रसारमाध्यमांसमोर तंत्रज्ञानाचे मोठे आव्हान उभे राहिले असून कितीही बदल झाला तरी पत्रकारांची आवश्यकता आहे मात्र पत्रकारांनी आयटी इंजिनिअर प्रमाणे या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. वृत्तपत्रांना लागणारा कागद, त्याच्या किमती, आर्थिक कारणे यामुळे प्रिंट मीडियाचा व्यवसाय कटकटीचा झाला असून भविष्यात प्रिंट मीडिया फार काळ टिकेल असे वाटत नाही. बदलत्या तंत्रज्ञानात टिकण्यासाठी पत्रकारांना तंत्रज्ञान व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व पत्रकारांना मिळवावे लागेल. दर्जेदार लिखाण करावे लागेल.
यशवंत समूहातर्फे पत्रकारांचा सन्मान…
यशवंत उद्योग समूहाच्या वतीने कार्यक्रमानंतर सर्व सुमारे १०० पत्रकारांचा नव वर्षाची डायरी व पेन देऊन मुकुंद चरेगावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.