‘कृष्णा’ व जयवंत शुगर्सची व्ही.एस.आय.च्या पुरस्कारांवर मोहोर – changbhalanews
राज्यशेतीवाडी

‘कृष्णा’ व जयवंत शुगर्सची व्ही.एस.आय.च्या पुरस्कारांवर मोहोर

सर्वोत्कृष्ट ऊसविकास संवर्धन पुरस्कार 'कृष्णा'ला; तर 'जयवंत शुगर्स'ला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सन २०२२-२३ या गळीत हंगामातील “कै. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन पुरस्कार” रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यास जाहीर करण्यात आला आहे. तर दक्षिण विभागात सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठीचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला जाहीर झाला आहे. या पुरस्कारांमुळे कृष्णा कारखान्याचे चेअरमन तथा जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या नियोजनबद्ध, पारदर्शक व प्रगतीशील कारभारावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, कृष्णा व जयवंत शुगर्स कारखान्याच्या शिरपेचात आणखी मानाचे तुरे रोवले गेले आहेत.

साखर क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेद्वारे पुरस्कार जाहीर केले जातात. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा संस्थेतर्फे नुकतीच करण्यात आली. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखान्यात जयवंत आदर्श कृषी योजनेच्या माध्यमातून विविध ऊसविकास संवर्धन योजना व उपक्रम राबविले जातात. या अंतर्गत त्रिस्तरीय ऊस बेणेमळ्याद्वारे ऊस बेणे वाटप, हंगामनिहाय व जातनिहाय लागवड योजना राबविण्यामध्ये सातत्य, ठिबक सिंचन योजनेची प्रभावी अंमलबजावणी, कारखान्याकडून बायोकंपोस्ट खत वाटप, शेतकरी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षणे, आधुनिक खोडवा व्यवस्थापन कार्यक्षेत्रात योजनेची प्रभावी अंमलबजावणी, माती व पाणी परिक्षण प्रयोगशाळेची स्थापना आणि त्याद्वारे माती व पाणी परिक्षण योजनेवर भर, जीवाणू खत प्रयोगशाळेची स्थापना आणि त्याद्वारे वेगवेगळ्या जीवाणू खताचे उत्पादन आणि वितरण केले जाते.

तसेच जयवंत शुगर्समध्ये उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठी १०० टक्क्यांहून अधिक गाळप क्षमतेचा वापर म्हणजे १४७.७४ टक्के गाळप क्षमतेचा वापर केला आहे. तसेच रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन ९६.३३ टक्के राहिले आहे. विशेष म्हणजे जयवंत शुगर्सने साखर तयार करण्यासाठी फक्त १६ टक्के इतकाच बगॅसचा वापर केला आहे. तसेच साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वाफेचा वापर ३१.९९ टक्के असून, विजेचा वापर २२.४६ किलोवॅट प्रतिटन ऊस इतका केला आहे.

कृष्णा कारखाना आणि जयवंत शुगर्सच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत व्ही.एस.आय.ने हे पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्कारांचे वितरण पुणे येथे ११ जानेवारी रोजी होणाऱ्या व्ही.एस.आय.च्या वार्षिक सभेमध्ये मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. या यशाबद्दल दोन्ही कारखान्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

जयवंत’च्या ऊसउत्पादक शेतकऱ्यास ऊसभूषण पुरस्कार

जयवंत शुगर्सचे सुर्ली (ता. कोरेगाव) येथील ऊसउत्पादक शेतकरी सुहास मधुकांत पाटील यांनी प्रति हेक्टरी २९९.२४ मेट्रिक टन ऊस उत्पादन पूर्व हंगामात घेतले आहे. त्यांना दक्षिण विभागातील ऊसभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close