स्वच्छ आणि पारदर्शक पत्रकारीतेची समाजाला गरज-पोलीस अधीक्षक समीर शेख
सातारा | (जिमाका)
सध्याची पत्रकारिता अनेक संक्रमणातून जात आहे.साताऱ्यातील पत्रकारिता देशाला व राज्याला दिशा दर्शक आहे. पत्रकारांनी कोणत्याही प्रकारच्या दबावांना, अमिषांना बळी न पडता पत्रकारितेमध्ये पारदर्शकता आणि स्वच्छ स्वरुप आणणे आवश्यक असल्याचे मत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी व्यक्त केले.
जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांचा स्मृतीदिन पत्रकार दिन येथील कृषी विभागाच्या बळीराजा सभागृहात साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष आणि सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, पत्रकार दीपक शिंदे, राहूल तपासे, सुजीत आंबेकर, सनी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले, अलीकडच्या काळात शोध पत्रकारिता वाढण्याची आवश्यकता आहे. कोणतेही काम करताना त्याला सत्यशोधनाचा आधार मिळाला तर अधिक आनंद देणारे असते. पण, हे करत असताना अनेक अडचणी येत असतात. दबाव येत असतात. त्याला बळी न पडता पत्रकारांना त्यांचे काम करता आले पाहिजे, यासाठी तशा पध्दतीचे वातावरण तयार झाले पाहिजे. पत्रकारितेमध्ये व्यावसायिकता आली असली तरी सर्वांची स्थिती एकसारखी नाही. त्यामुळे नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची व्यवस्थाही या पत्रकारितेमध्ये असली पाहिजे. पत्रकारीतेमध्ये गती, सत्यता आणि विश्वासाहार्यता महत्वाची असते. या क्षेत्रात येणाऱ्या नवीन लोकांना प्रशिक्षणाची गरज असते त्यांच्यासाठी संघटनेने नवीन कोर्सेस सुरु केले तर पोलीसांमार्फत त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल.सोशल मीडिया चा चुकीचा वापर केला गेला तर गंभीर प्रकार होतात.त्यावर आळा बसणे आवश्यक आहे. अफवा पसरवणे हा गुन्हा असून अशा व्यक्तींवर कारवाई केली जाईल.साताऱ्यातील पत्रकारीतेला दर्जा असल्याने सोशल माध्यमांबाबत एक एसओपी तयार करावी लागणार असून त्याबाबत जिल्हा पत्रकार संघाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे म्हणाले, विभागीय समितीचा अध्यक्ष म्हणून अधिक सकारात्मक राहून जास्तीत जास्त पत्रकारांना अधिस्वीकृती देण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याबरोबर ही प्रक्रिया सोपी व्हावी आणि पत्रकार कल्याणाच्या विविध योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. बाळाशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभही जिल्ह्यातील पत्रकरांना मिळवून देण्याचा प्रयत्न पुढील तीन वर्षांच्या काळात विशेषत्वाने केला जाईल.
सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले, अपुऱ्या माहितीच्या आधारे चुकीचे समज पसरविणाऱ्या लोकांवर कारवाई होणे आवश्यक आहे. साताऱ्यातील पत्रकारितेला मोठा इतिहास असून त्याप्रमाणे चांगली वाटचाल सुरु आहे.
यावेळी पत्रकार सनी शिंदे, सुजीत आंबेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले. दीपक शिंदे यांनी सुत्रसंचालन तर जयंत लंगडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला अधिस्वीकृती समितीचे सदस्य चंद्रसेन जाधव, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, दत्ता मर्ढेकर, अजित जगताप, केशव चव्हाण, अरुण जावळे, वैभव जाधव, विष्णू शिंदे यांच्यासह प्रिंट, इलेक्टॉनिक आणि डिजिटल मिडियाचे सर्व पत्रकार उपस्थित होते.