नागरिकांच्या मागणीनुसार कराडच्या युनिक उड्डाणपुलाला कराड मलकापूरसाठी अॅप्रोच रस्ता द्यावा
खा. श्नी. छ. उदयनराजे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराडच्या युनिक पुलाच्या आराखड्यात कराड व मलकापूर शहरातील सर्वपक्षीय नागरिकांच्या मागणीनुसार प्रसंगी बदल करावा , कराड शहराला व मलकापूर शहराला युनिक उड्डाणपुलाला जोडणारा जवळचा अॅप्रोच रस्ता द्यावा व महामार्गाशी कराडची असलेली जवळीक तुटू देऊ नये, अशी मागणी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, या मागणीवर गडकरी यांनी आराखड्यात आवश्यक तो बदल करण्याच्या सूचना तातडीने महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर पासून ते वारुंजी फाटा पर्यंत यूनिक उड्डाणपूल साकारला जात आहे. हा साडेतीन किलोमीटरचा फ्लाय ओव्हर ब्रिज आहे. मात्र या उड्डाण पुलावरून कराड आणि मलकापूर शहरासाठी जवळचा अॅप्रोच रस्ता देण्यात आलेला नाही, असं सांगत सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने यासंदर्भात 10 जानेवारीपर्यंत योग्य ती कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या प्रश्नी खा. उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तीव्र लढा उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर खा. श्री. छ. उदयनराजेंनी गडकरी यांची बुधवारी (दि. २०) नवी दिल्ली येथे भेट घेतली.
कराडजवळ महामार्गावरील पूलाला रस्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे शहरातून महामार्गावर येण्यास बराच वेळ लागणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या प्रश्नी माजी आ. आनंदराव पाटील, डॉ. अतुल भोसले, माजी नगरसेवक राजेंद्रसिंह यादव आणि इतर लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची यासंदर्भात खा. श्री. छ. उदयनराजे यांच्यासोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत करण्यात आलेल्या मागण्यांची माहिती खा. श्री. छ. उदयनराजे यांनी या भेटीदरम्यान गडकरी यांना दिली.
दरम्यान , यावर गडकरी यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आराखड्यात उचित बदल करण्याच्या सूचना दिल्याच्या समजते. तसेच उंब्रजला सरपंच आणि ग्रामस्थांनी हरकत घेऊन उड्डाणपुलाच्या जागी कोणतीही अतिरिक्त जमीन संपादित न करता नवीन उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी केली असल्याचे खा श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सांगून याबाबतही कार्यवाही करण्याची मागणी गडकरी यांच्याकडे केली.
अजिंक्यतारा ते जनाई-मळाई डोंगर हा वन्यजीवांचा पारंपरिक स्थलांतरमार्ग असून, महामार्ग विस्तारीकरणामुळे तो विभक्त झाला आहे. वन्यप्राण्यांना ये-जा करण्यासाठी पुलासारखा मार्ग तयार करावा, अजिंक्यताऱ्याच्या बाजूला महामार्गालगत तार कुंपण करावे, तसेच उतारावरील वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रम्बलर स्ट्रिप आणि वन्यजीवांचा वावर दर्शविणारे फलक उभारावेत, अशा मागण्या खा. श्री. छ. उदयनराजे यांनी केल्या.
केंद्रीय मार्ग निधीमधून (सीआरएफ) सातारा जिल्ह्यातील रस्तेदुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी, तसेच ब्रिटिशकालीन पुलांच्या डागडुजीसाठी २०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ मिळावा, अशी मागणीही खा. श्री. छ. उदयनराजे यांनी केली. गडकरी यांनी या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत लवकरच योग्य ती कार्यवाही सुरू होईल, असे सांगण्यात आले.