चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार असे सरकार म्हणते मात्र कुणबी हा ओबीसीच आहे मग आज पर्यंत कुणबीला आरक्षणापासून वंचित का ठेवले कुणबी हा ओबीसी आहे तर मग आरक्षणाला धक्का लावायचा प्रश्न येतोच कुठे? असा खडा सवाल श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केला
श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी उंडाळे ता. कराड येथे सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या साखळी उषोणास भेट दिली. त्यावेळी पाटणकर बोलत होते.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, १८८० साली इंग्रज सरकारने केलेल्या जनगणनेत पूर्वीच्या सातारा जिल्ह्यात (आजचा सातारा-सांगली) इंग्रजी गॅझेट मध्ये ५ लाख ४४ हजार कुणबी नोंदी आहेत. आज एवढ्या वर्षात जिल्ह्यात काही नोंदी वाढलेल्या असतील का नाही? कुणबी हा ओबीसी मध्ये मोडला जात आहे . असे असताना मग या गॅझेटमध्ये असलेल्या केवळ सातारा जिल्ह्यातील ५ लाख ४४ हजार कुणबी लोकांच्यावर आजपर्यंत ओबीसी असून सुद्धा अन्याय झाला नाही का ? मग त्यांना आजपर्यंत आरक्षणापासून वंचित कोणी ठेवले, याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे, हे जरी खरे असले तरी प्रत्यक्षात कुणबी हा ओबीसीतच आहे. मग त्यांच्यावर अन्याय का? आणि नोंदी सापडलेल्या कुणबींना न्याय केव्हा मिळणार?. आजपर्यंत अन्याय होऊनही कुणबी गप्प होता. त्याला शासनाने न्याय देणे गरजेचे आहे आणि कोणाच्या आरक्षणाला धक्का लावणे न लावणे यापेक्षा जो ओबीसी आहे , त्याला ओबीसीतूनच आरक्षण मिळायला हवे. आरक्षणाच्या बाबतीत भूमिका घेणारे नेत्यांनी त्याच्या समाजातील आपल्या महापुरुषाची चरित्र वाचावीत म्हणजे त्या महापुरुषांचे सामान्य जनतेबद्दल असलेले मत लक्षात येईल.
मनोज जरांगे-पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा जाहीर…
मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आजपर्यंत झालेल्या संपूर्ण लढ्यात श्रमिक मुक्ती मुक्तीदल सातत्याने पुढे होते व त्या आरक्षणाला पाठिंबा होता. आजही मनोज जरांगे-पाटील यांनी उभा केलेल्या मराठा आरक्षण लढ्याला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
उंडाळेच्या साखळी उपोषण होता ३३ वा दिवस…
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उंडाळे येथे सुरू असलेल्या साखळी पोषणाचा आजचा ३३ वा दिवस होता, या उपोषणाला विभागातील सर्व संस्था व मान्यवर मराठा आरक्षणातील नेते यांनी पाठिंबा दिला आहे.