कराडला पोलिसांकडून कोबिंग ऑपरेशन; १ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त व दंडात्मक कारवाई
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
मुजावर कॉलनी, सूर्यवंशी मळा आणि कार्वे नाका या कराड शहरातील परिसरात पोलिसांनी बुधवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत २० हजार रूपयांचा गुटख्याचा साठा, वाहनांमध्ये घरगुती गॅस भरण्याचे साहित्य मिळून सुमारे १ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
कराड शहर व परिसरात मागील काही दिवसात गुन्हेगारीने उचल खाल्ली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल, उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या सूचनेनुसार कराड शहर पोलिसांनी पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे तसेच अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या मोहिमेत मुजावर कॉलनीतील सुनील विजय गवळी हा धारदार कोयता घेऊन वावरत असल्याचे समोर आले. त्यामुळे याप्रकरणी त्याच्या विरोधात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर याच कॉलनीत मुस्ताक हमीद मुल्ला याने त्याच्या घरामागे आडोशाला सुमारे वीस हजार रुपयांचा गुटखा लपवून ठेवण्याचे समोर आले. गुटख्याचा हा साठा जप्त करत पोलिसांनी मुस्ताक मुल्ला याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या दोघांसह मुजावर कॉलनी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या असिफ नबीलाल मोमीन याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. मोमीन हा घरगुती गॅस रिक्षासह अन्य वाहनात भरून देत होता आणि त्यासाठीची आवश्यक साहित्य त्याच्याकडे मिळून आले आहे. सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे हे साहित्य पोलिसांनी जप्त करून त्याच्यावरही कारवाई केली आहे.
दोन तासात ६६ हजाराचा दंड वसूल
कराड शहर पोलिसांनी अचानकपणे कोम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सावरण्याची संधी दिली नाही. या मोहिमेत कार्वे नाका परिसरात नाकाबंदी करण्यात येऊन सुमारे ६० वाहनांची तपासणी करण्यात आली. संबंधित वाहनांच्या चालकांवर कारवाई करत सुमारे ६६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.