मलकापूरची २४ बाय ७ योजना अखंडीत सुरू राहणे हीच भास्करराव शिंदे यांना खरी आदरांजली : आ. पृथ्वीराज चव्हाण – changbhalanews
राजकियराज्य

मलकापूरची २४ बाय ७ योजना अखंडीत सुरू राहणे हीच भास्करराव शिंदे यांना खरी आदरांजली : आ. पृथ्वीराज चव्हाण

चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
मलकापूर शहरात सुरू असलेली २४ बाय ७ नळ पाणीपुरवठा योजना क्रांतिकारक आहे. ही योजना पाहण्यासाठी देशभरांमधून अनेक लोक येत असतात. योजना सुरू करण्यात स्व. भास्करराव शिंदे यांचे मोठे योगदान आहे. या योजनेच्या विस्तार वाढीसाठी १८.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. योजना २००९ पासून अखंडितपणे सुरू असून हीच खरी भास्करराव शिंदे यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

मलकापूर ता. कराड येथे स्वा. सै. स्व. भास्करराव शिंदे यांच्या नवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळ व गांधी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. श्रीनिवास पाटील होते. आ. मोहनराव कदम, गांधी ज्वेलर्सचे धीरज गांधी, अॅड. उदयसिंह पाटील, नगराध्यक्ष नीलम येडगे, तहसीलदार विजय पवार, प्रशांत चांदे, सागर जाधव, आनंदराव सुतार, वसंतराव शिंदे, इंद्रजीत चव्हाण, शंकरराव खबाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मलकापूरच्या उभारणीत स्वर्गीय भास्करराव शिंदे यांचे मोलाचे योगदान आहे. कराडलगत असलेल्या मलकापूर या छोट्या गावाचा आज झपाट्याने विस्तार होत आहे. भास्करराव शिंदे यांच्या प्रयत्नातून मलकापूरमध्ये २४ बाय ७ नळ पाणीपुरवठा योजना राबवली. या योजनेमुळे मलकापूरचे नाव देशाच्या नकाशावर ठळकपणे उमटले. या योजनेद्वारे मीटरने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याचा अपव्यय टाळला जातो. स्वयंचलित मीटर पद्धती असल्याने लोकांना त्रास होत नाही. सध्या पाण्याची गरज वाढत असल्याने व मलकापूरत मिळत असलेल्या २४ तास मुबलक व स्वच्छ पाण्याचा तसेच नगर परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांचा विचार करून मलकापुरात वास्तव्यास येणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहराचा विस्तार वाढ होत आहे. मलकापूरच्या २४ बाय ७ योजनेमुळे देशातील नगरपालिका पातळीवर मलकापूरचा तिसरा क्रमांक मिळाला आहे. ही मलकापूरकरांसाठी गौरवाची बाब आहे.

मलकापूरमध्ये वाढती पाण्याची मागणी विचारात घेता योजनेचा विस्तार वाढ होणे गरजेचे होते. त्यासाठी मनोहर शिंदे पाठपुरावा करत होते. एक वर्षापासून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत होतो. त्यानुसार काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मलकापूरच्या पाणी योजनेच्या विस्तार वाढीसाठी १८.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, याबद्दल मी मुख्यमंत्री यांचे धन्यवाद मानू इच्छितो.

मलकापूरच्या पाणी योजना बरोबरच उंडाळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे पुनर्जीवन केले आहे. त्यानुसार ज्या गावांना या योजनेचे पाणी पाहिजे त्यांना ते बल्क स्वरूपात दिले जाणार आहे. त्यामुळे अनेक गावांचा पाण्याची गरज भागवली जाणार आहे.

मलकापूरमध्ये मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कारभार केला जात असल्याने शहराचा झपाट्याने विकास होता आहे. मलकापूर नगरपरिषद इमारत अंतिम टप्प्यात असून त्यासाठी आणखी काही निधीची गरज आहे. तो मिळावा म्हणून पाठपुरावा सुरू आहे. स्वर्गीय भास्करराव शिंदे यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले म्हणून त्यांनी आमदार झाल्यानंतर शिक्षण संस्थांबरोबरच सहकारी संस्था निर्माण करून त्या माध्यमातून मलकापूरकरांचा विकास साधला.

नेत्र तपासणी शिबिराबरोबरच आहाराविषयी व्याख्यान आयोजित करून लोकांना आहाराबाबत जागृत करणे गरजेचे आहे, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
सैदापूर नगरपंचायत झाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विकास होण्यासाठी रस्ते, पाणी अशा सुविधा लोकांना मिळणे गरजेचे आहे. त्या सुविधा व्यवस्थित मिळून लोकांच्या राहणीमानीचा दर्जा उंचावण्यासाठी सैदापूरची नगरपंचायत होणे गरजेचे असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.

खा. श्रीनिवास पाटील म्हणाले , आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. त्यांच्यामुळे कराडच्या विमानतळाला २१९ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. सध्या मुलांमध्ये डोळ्यांच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. दहा पैकी आठ ते नऊ मुलांना चष्मा लागला आहे. ही बाब टाळायची असेल तर मुलांना मोबाईल व टीव्हीपासून दूर ठेवले पाहिजे. स्व. भास्करराव शिंदे यांचे मलकापूरच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांनी शाळा, पाणी, आरोग्य अशा सुविधा निर्माण केल्या.

मनोहर शिंदे म्हणाले, मलकापूरमध्ये सोयी, सुविधा निर्माण करण्यात दादांचे मोठे योगदान आहे. एका गाळ्यामध्ये सुरू झालेल्या शिक्षण संस्थेची आज मोठी इमारत उभी राहिली आहे. मलकापूरमधील सर्वसामान्य शेतकरी डोळ्यासमोर ठेवून दादांनी अनेक संस्था निर्माण केल्या. त्यांना विकासाची दूरदृष्टी होती.

गेली अनेक वर्षे शहरात अखंडपणे मीटरने पाणी दिले जात आहे. याचे संपूर्ण श्रेय दादांना जाते. मात्र मलकापूरचा वाढता विस्तार लक्षात घेता पाण्याची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली होती. त्यामुळे २२ तास पंपिंग सुरू ठेवावे लागत होते. त्याचा परिणाम काही वेळेला पाणीपुरवठ्यावर होत होता. याचा विचार करून योजना यापुढेही अखंडितपणे सुरू राहिली पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. योजनेचा विस्तार वाढवावा म्हणून बाबांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले असून मुख्यमंत्र्यांनी १८.५० कोटी रुपयांचा या योजनेच्या विस्तार वाढीसाठी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे भविष्यातही ही योजना आहे त्याच ताकदीने पुढे अखंडितपणे सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला शालेय स्पर्धाअंतर्गत यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच आरोग्य कर्मचारी व विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आनंदराव सुतार यांनी आभार मानले.

… अन् मनोहर शिंदे झाले भावूक!
मलकापूर शहराच्या विकासात ‘माय फ्रेंड’ म्हणून प्रसिद्ध असलेले स्वर्गीय स्वा. सै. तथा माजी आमदार भास्करराव शिंदे दादा यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय , राबवलेल्या योजना यामागे किती दूरदृष्टी होती याची प्रचिती आज आज मलकापूर शहराच्या नागरिकांना येत आहे. कोणतंही शहर ज्यावेळी नावारूपाला येतं, त्यावेळी त्या पाठीमागे त्या शहराच्या तत्कालीन नेतृत्वाची कल्पक दृष्टी कारणीभूत असते, हे स्वर्गीय माजी आमदार भास्करराव शिंदे आणि त्यांच्या मलकापूर शहराबाबत आवर्जून म्हटलं जातं. मलकापूरची २४ बाय ७ योजना ही त्यांच्याच दूरदृष्टीची प्रचिती आहे. आज हीच योजना देशात दीपस्तंभ ठरली आहे, त्यामुळे या योजनेबद्दल बोलताना स्वर्गीय स्वा. सै. माजी आमदार भास्कररावजी शिंदे दादांच्या आठवणीने उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे भावूक झाले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close