दुर्गम व डोंगरी भागातील धनगर वाड्यातील मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्या
प्रवीण काकडे यांची मागणी :आपदग्रस्त धनगरवाड्यावर भेट
चांगभलं ऑनलाइन | कोल्हापूर
डोंगरी दुर्गम आणि चोहोबाजूंनी जंगलाने वेढलेल्या धनगर वाड्यावरील मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांनी महाराष्ट्र शासनाकडे एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे केली आहे . दरम्यान, सारिका बबन गावडे राहणार तळीचा धनगरवाडा तालुका शाहुवाडी जि कोल्हापूर येथील मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला होता, या आपत्तीग्रस्त कुटुंबियांची काकडे यांनी सांत्वन भेट घेतली. त्या अनुषंगाने एकंदर परिस्थितीचा विचार करून धनगर वाड्यावरील मुलांच्या शैक्षणिक बाबींचा विचार करून ही मागणी काकडे यांच्याकडून करण्यात आली.
याप्रसंगी तानाजीराव बोडके जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोल्हापूर, गंगाराम बोडके, अनिल गोरे, सखाराम गावडे, बबन गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी काकडे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षाचा कालखंड गेला देशाने अमृतमहोत्सव साजरा केला तरीही आजही धनगर समाज सर्व सुविधा पासून वंचित आहे. डोंगरदऱ्याखोऱ्यातील गोरगरीब समाज बांधवांना आजही रस्ते आरोग्य पाणी लाईट सुविधा पासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. धनगर वाड्यावरील असलेल्या शाळा देखील बंद झाल्या आहेत येथील विद्यार्थ्यांना १२ ते १५ किलोमीटर पायी चालत जाऊन शिक्षण घ्यावे लागते आहे. पायी चालत चालत जात असल्यामुळे वनप्राण्यांच्या पासून मोठा धोका आहे, तरी महाराष्ट्र शासनाने डोंगरी विभागामध्ये निवासी शाळा उपलब्ध करून द्याव्यात, आजही कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे सांगली, जिल्ह्यातील डोंगरी भागातील विद्यार्थ्यांच्यावर वन्य प्राण्यांच्यापासून खूप मोठ्या प्रमाणावर हल्ले झालेले आहेत. आणि त्यामुळे वनप्राण्यांच्या हल्ल्याच्या भीतीपोटी आजही धनगर वाड्यावरील मुले शाळेत जायला मागत नाहीत आणि धनगर समाजासह डोंगरदऱ्या खोऱ्यातील व इतर समाज बांधवांची मुलं सुद्धा शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे. आजही कित्येक समाज बांधव मृत्युमुखी पडलेले आहेत. या यामध्ये वाघ, बिबट्या, अस्वले, गवे रेडे यांच्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. वनप्राण्यांच्या हल्ल्यामुळे समाजामध्ये एक प्रकारे भीतीच वातावरण निर्माण झालेले आहे. महाराष्ट्र शासनाने या समाजाचा गांभीर्याने विचार करून समाज बांधवांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे, कारण आजही त्या ठिकाणी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत.
तसेच धनगर वाड्यावर त्यावरील शेतकरी बांधव समाज बांधव यांना वन अधिकार्यांच्या पासून नाहक त्रास सुद्धा सहन करावा लागतो आहे. या त्रासाला सुद्धा समाज कंटाळलेला आहे.त्यांना जीवन जगणे मुश्किल झालेले आहे. अशा परिस्थितीत वन प्राण्यांचे सुद्धा हल्ले होतात. अशा या समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र शासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत, कारण आजही हा समाज शिक्षणापासून वंचित आहे . आजही धनगर समाज अंधारात आहे त्याला प्रकाशाकडे न्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाने शिक्षणाची गंगा ही वाड्यावर पोहचली पाहिजे आणि त्या अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराचं राज्य म्हणून बघितले जात. पण खऱ्या अर्थानं त्या सुविधा पुरविण्यात आपण अपयशी ठरलेला आहोत. तरी आमच्या या मागणीचा विचार करावा.
आजही या सातही जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांच्या जमिनी नावावर नाहीत, फॉरेस्ट खाते नाहक त्रास देते, पिढ्यानपिढ्या जमिनी कसत असून घरामध्ये वास्तव्य असून सुद्धा त्यांच्या नावावर ते उतारे किंवा सातबारा मिळत नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, तरी महाराष्ट्र शासनाने शिक्षणाच्या बाबतीत वरील सर्व मागण्यांचा विचार करून समाज बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी प्रविण काकडे यांनी केली आहे.