ऊस दरासाठी कराडनजिक रयत क्रांती संघटनेचा रास्ता रोको
राजू शेट्टींनी केलेली तडजोड अमान्य : मागील ५०० तर यंदा पहिली उचल एफआरपी अधिक ५०० ची मागणी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा राज्याच्या ऊसदर नियंत्रण समितीचे सदस्य सचिन नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील कराडनजिकच्या सैदापूर येथील बनवडी फाट्यावर आज, शुक्रवारी जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनासोबत बैठक घेत तडजोड केलेला ३१०० रुपयांचा दर मान्य नसल्याचे सांगत दुसरा हप्ता म्हणून मागील ५०० रूपयेच पाहिजेत, तसेच यंदा पहिली उचल ही एफआरपी अधिक ५०० रूपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यावेत, अशी रयत क्रांती संघटनेची मागणी आहे. या मागणीवर आम्ही ठाम आहोत. त्यामुळे येत्या चार दिवसात दर जाहीर न केल्यास कारखाने बंद पाडू, असा इशारा सचिन नलावडे यांनी यावेळी दिला.
नलावडे म्हणाले, गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनाशी तोडजोड करत मान्य केलेला ३१०० चा दर चुकीचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा होत असून यावर्षीच्या उसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळालीच पाहिजे. एफआरपी अधिक ५०० रूपये शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत. त्याचबरोबर मागील वर्षी गाळप झालेल्या उसाला प्रति टन ५०० रुपये अधिकचे मिळाले पाहिजेत. तसेच ऊस दरासोबत दुधाला ३५ रुपये प्रति लिटर दर मिळालाच पाहिजे, अशी मागणी नलावडे यांनी केली.
दूध दराचा अध्यादेश फाडून निषेध…
या आंदोलनात राज्य शासनाने दूध दरासाठी काढलेला परंतु दूध संघ आणि संस्थांनी वाटाण्याच्या अक्षता लावलेला राज्य शासनाचा अध्यादेश फाडून रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
अजितदादांनी सातारा जिल्ह्यातील कारखानदारांचा क्लास घ्यावा…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे त्यांच्या सोमेश्वर , माळेगाव व इतर साखर कारखान्यांना गेल्या वर्षीचा दर हा एफआरपी अधिक ५५० रुपये जास्त देत आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांचाही अजितदादांनी क्लास घ्यावा. किंवा त्यांच्याकडे सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाने क्लास लावावा म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे पैसे मिळू शकतील.
– सचिन नलावडे, सदस्य, ऊस दर नियंत्रण समिती महाराष्ट्र शासन.