प्रकाश वायदंडे यांना राज्य शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर
पारधी मुक्ती आंदोलनाच्या कार्याची दखल : मान्यवरांकडून कौतुक
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
पारधी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष, दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश रामचंद्र वायदंडे ( रा .कार्वे ता. कराड जि. सातारा) यांना राज्य शासनाच्या
आदिवासी विकास विभागाचा यंदाचा आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक संस्थांना आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मानपत्र , सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सदरचे पुरस्काराचे वितरण दि.२९ नोव्हेंबर २०२३ रोजी हॉटेल रॉयल हेरिटेज, नाशिक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
प्रकाश वायदंडे यांनी दलित महासंघाचे चळवळीत काम करीत असताना आदिवासी पारधी जमातीचे पुनर्वसन व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केले. तसेच मुलांना शिक्षणासाठी सहकार्य करीत अनेक मुलांना शाळेत पाठवले. पारधी जमातीमधील व्यसनाधीनता कमी करीत त्यांच्यामधील पाप पुछवानी प्रथेस सांघीकपणे प्रयत्न करीत आळा घालण्याचे उल्लेखनीय काम केले. पारधी मुक्ती आंदोलन या संघटनेच्या माध्यमातून पारधी जमातीस समाजाचे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत.पारधी कुटूंबाचे सर्वेक्षण करून त्यांना शिधापत्रिका, जमातीचा दाखला , मतदार यादीमध्ये नांव समाविष्ट करणे याशिवाय प्रशासनाचे सहकार्याने ज्या गावांमध्ये पारधी कुटुंबांचे वास्तव्य आहे त्याच गांवी शासकीय भूखंड देऊन त्यावर घरकुल योजनेचा लाभ देण्याचा उपक्रम राज्यभरात स्तुत्य ठरला आहे.शासनाच्या विविध विकास योजना पारधी कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रकाश वायदंडे यांनी केले आहे.
पारधी समाजजीवन..,एक अवलोकन!या ग्रंथाद्वारे त्यांनी पारधी जमातीच्या चाली,रिती ,रुढी -परंपरा, संस्कृती तसेच त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, भिमाकोरेगांव लढाईतील सहभाग आणि पारध्यांच्या कुळीमधील पुर्वज समाजसमोर आणले आहेत. तसेच या जमातीस समाजाचे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सोप्या पद्धतीने कोणते प्रयत्न केले पाहिजेत याविषयी आराखडा मांडला आहे. सदरचा ग्रंथ शिवाजी विद्यापीठाच्या अनेक महाविद्यालामधील समाजशास्त्राचे विद्यार्थी अभ्यासत आहेत.
या पुरस्काराबद्दल प्रकाश वायदंडे यांचे जेष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे, राज्याचे माजी सहकार मंत्री आ.बाळासाहेब पाटील, दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे, कृष्णा बॅंकेचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले, प्रा.डॉ.शरद गायकवाड, दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे -पाटील, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक निवासराव थोरात, युवा नेते वैभव (भैया) थोरात , कार्वेचे सरपंच सर्जेराव कुंभार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे संजय तडाखे, हरिभाऊ बल्लाळ, प्रा.पै.अमोल साठे, रमेश सातपुते, गजानन सकट, दत्ता भिसे, सामाजिक क्षेत्रातील युवा नेते विजयभाऊ यादव, प्रमोद तोडकर, पवन निकम, ‘चांगभलं न्यूज’चे संपादक हैबतराव आडके, बोधी फौंडेशनचे विकास मस्के, राहुल वायदंडे, जावेद नायकवडी यांचेसह महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा व जिल्हा परिषदेमधील अनेक अधिकारी, तलाठी पटवारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल, प्रा. जीवन पवार, पारधी मुक्ती आंदोलनाचे अनिल कांबळे, कैलास पवार, रेश्मा पवार, चान्सलर काळे , तात्या पवार ,जनार्दन मुळे यांनी अभिनंदन केले आहे.