चक्काजामसाठी पंचगंगा पुलावर स्वाभिमानीचे कार्यकर्ते दाखल
पोलिसांकडून शीघ्र कृती दल तैनात, प्रमुख कार्यकर्त्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात
चांगभलं ऑनलाइन | कोल्हापूर
उसाचे मागील चारशे रुपये व गळितास जाणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रुपये प्रमाणे मिळाली पाहिजे, या मागणीसाठी आज कोल्हापूरच्या पंचगंगा पूलावर बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हजारो कार्यकर्ते पंचगंगा पुलावर दाखल झाले आहेत.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्या त्या जिल्ह्यातूनच रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. तरीही हे आंदोलन होणारच, शेतकऱ्यांवर माझा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलनाच्या सुरुवातीला प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राजू शेट्टी यांनी दिली आहे.
ऊसदराच्या प्रश्नासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आजपासून पंचगंगा पलावर पुणे-बेंगलोर महामार्गावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर काल मुंबई येथे मंत्रालयात शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. मात्र या बैठकीत यशस्वी तोडगा निघू शकला नाही, त्यानंतर आंदोलनावर ठाम असल्याचे राजू शेट्टी यांच्याकडून काल सायंकाळी जाहीर करण्यात आलं होतं. या आंदोलनाचा पूर्वानुभव पाहता पोलिसांनी काल रात्री उशिरा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांना त्या त्या जिल्ह्यातून ताब्यात घेतलं आहे. तरीही राजू शेट्टी आणि सांगितल्याप्रमाणे हजारो कार्यकर्ते पंचगंगा पुलावर दाखल झाले आहेत. काही ठिकाणी हे आंदोलन गनिमी काव्याने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जलद कृती दलाचे पोलीस पथक पंचगंगा पुलाच्या परिसरात तैनात करण्यात आले आहे.
आंदोलनापूर्वी राजू शेट्टी कोल्हापूर येथे जाऊन श्री महालक्ष्मी, अंबाबाईचे दर्शन घेऊन पंचगंगा पुलावर येणार आहेत. त्यानंतर आंदोलन सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राजू शेट्टी यांनी सांगितले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आत टाकले आहेत, मात्र तरीही माझा शेतकऱ्यांच्यावर पूर्ण विश्वास असून कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.
साताऱ्याचे कार्यकर्ते आंदोलनस्थळी…
कोल्हापूर येथे आंदोलन स्थळ आहे पंचगंगा पूल. या आंदोलन स्थळावर आज पहाटे स्वाभिमानी संघटनेचे सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी व व प्रमुख कार्यकर्ते पोहचले आहेत. देवानंद पाटील,बापूसाहेब साळुंखे, रामचंद्र साळुंखे, उत्तम साळुंखे आदींचा त्यामध्ये समावेश आहे.