पंढरपूरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक केली श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा – changbhalanews
आपली संस्कृतीराज्य

पंढरपूरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक केली श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

यंदा वारकरी पूजेचा मान दिंडोरी तालुक्यातील बबन घुगे व वत्सला घुगे दाम्पत्याला मिळाला

चांगभलं ऑनलाइन | पंढरपूर
कार्तिकी एकादशी निमित्त गुरूवारी पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली. यंदा मानाच्या वारकरी पूजेचा मान दिंडोरी (जि. नाशिक) तालुक्यातील माळेदुमाला गावच्या बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे या दाम्पत्याला मिळाला. घुगे दाम्पत्य हे गेल्या १५ वर्षांपासून न चुकता वारी करत आहेत.

कार्तिकी एकादशी निमित्त यंदाची शासकीय महापूजा मोठ्या उत्साहात केली गेली. प्रथेप्रमाणे कार्तिकी एकादशी निमित्त पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते महापूजा करण्यात आली. सुरुवातीला श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला, आणि त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. राज्यातील बळीराजाला सुखी ठेव, अशी मागणी आपण विठूरायाच्या चरणी केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

घुगे दांपत्याचे पंधरा वर्षापासून पायी वारी…
शासकीय पुजेसोबतच विठ्ठलाची पूजा करण्याचा मान यावेळी नाशिक जिल्ह्यातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना मिळाला. घुगे हे दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील रहिवाशी आहेत. ते गेल्या १५ वर्षांपासून न चुकता वारी करत आहेत. या पूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी घुगे दाम्पत्य यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यातील समस्या सोडवण्यासाठी शक्ती द्यावी- फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, परंपरेनुसारच आज महापूजेसाठी आलो आहे. कार्तिकी एकादशी हा राजकीय कार्यक्रम नाही. राज्यापुढे आज अनेक समस्या अनेक आहेत. त्या सोडवण्याच्या दृष्टीने आम्हाला शक्ती द्यावी, आशीर्वाद द्यावा आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, असं साकडं विठ्ठलचरणी घातल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान, सकल मराठा समाज आंदोलकांनी शासकीय महापूजेला असलेला विरोध मागे घेतला याबद्दल पंढरपूरमधील मराठा समाजाचे त्यांनी आभार मानले.
सर्वांना वाटतं शेतकऱ्यांना दर जास्त मिळावा, परंतु काही समस्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही फडणवीस यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या ऊस दर आंदोलनाविषयी बोलताना सांगितले.

मागण्या मान्य झाल्याने पंढरपुरातील आंदोलन मागे…

पंढरपूर येथे मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिष्टमंडळाने पाच मागण्या समोर ठेवल्या होत्या. त्या प्रशासनाने मान्य असल्याचे सांगितले. त्यानंतर मराठा आंदोलक गणेश महाराज जाधव यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.

मराठा आंदोलकांच्या या होत्या पाच मागण्या…

१) मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या २४ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या मुदतीत मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.
२) पंढरपूर शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी जुन्या दप्तरातील जन्म आणि जात नोंदणी सापडून येत नाहीत. सदर जुनी दप्तर उपलब्ध करून मोडी व उर्दू लिपीच्या माहितगारांची शासनाने नियुक्ती करावी.
३) पंढरपूर शहरामध्ये शासकीय अथवा नगरपालिकेच्या जागेत मराठा भवन इमारतीची उभारणी करावी.
४) पंढरपूर येथे मराठा मुले व मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह उभारण्यात यावे.
५) सारथी संस्थेचे पंढरपूर येथे उपकेंद्र उभारण्यात यावे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close