चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत कदम व सर्व आजी-माजी सैनिकांच्या मागणीला यश आले असून कराड तालुका प्रशासनाने धडाडीचे पाऊल टाकत महाराष्ट्रात प्रथमच कराड तहसील कार्यालयात “सैनिक कक्ष” सुरू केला. सोमवारी, दि. २० नोव्हेंबर रोजी नवीन प्रशासकीय इमारतीत झालेल्या सैनिक मेळाव्यात सैनिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्याबरोबरच सैनिक कक्ष सुरू झाल्याची अधिकृत घोषणा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार विजय पवार यांच्याकडून करण्यात आली. दरम्यान, सैनिक कक्ष स्थापन झाल्यामुळे आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे सैनिक फेडरेशनने सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर “सैनिक कक्ष” स्थापन करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार सर्व तालुकास्तरावर तहसील कार्यालयामध्ये आजी/माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, शहीद जवानांचे कुटुंबीय यांच्या समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी, निराकरण करण्यासाठी “सैनिक कक्ष” स्थापनेसाठी जिल्हाधिकारी डूडी यांनी परिपत्रक काढून सर्व तालुक्यातील तहसीलदार यांना सुचित केले आहे.
याची अंमलबजावणी प्रथम कराड तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार विजय पवार यांनी सोमवार दि. २० नोव्हेंबर रोजी सैनिक मेळावा आयोजित करून केली. त्यामुळे आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी “सैनिक कक्ष” सुरू करणारा कराड तालुका हा राज्यातला पहिला तालुका ठरला आहे.
यावेळी झालेल्या सैनिक मेळाव्यात तहसीलदार विजय पवार यांनी सैनिकांच्या तक्रारी अर्जाचे निराकरण केले व सैनिकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आजी-माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय, शहीद जवानांचे कुटुंबिय यांच्या महसूल विभागातील , अन्य प्रशासकीय विभागातील कोणत्याही समस्या असोत त्या तातडीने व प्राधान्य क्रमाने सोडवल्या जातील. यासाठी “सैनिक कक्ष” आजपासून कार्यान्वित होत आहे. तरी सर्व आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी सैनिक कक्षामध्ये आपले तक्रारी अर्ज जमा करावेत, त्याची दखल तात्काळ घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या प्रसंगी कराड तालुका नायब तहसीलदार बाबुराव राठोड, सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष व अमृत वीर जवान अभियान माजी सैनिक संघटना कराड तालुका प्रतिनिधी प्रशांत कदम, कराड दक्षिण सैनिक फेडरेशनचे तालुकाध्यक्ष सरपंच चंद्रकांत साठे, कराड उत्तर तालुका अध्यक्ष सदाशिव नागने, उपाध्यक्ष सचिन माने, उपाध्यक्ष मनोज चव्हाण, संघटक अस्लम शेख, कराड तालुका पेन्शनर संघटना अध्यक्ष नागेश जाधव, काले माजी सैनिक संघटना अध्यक्ष महादेव देशमाने, आर. के. पाटील, माणिक पाटील, राजकुमार बाबर, मन्सूर दिवान, राजेन्द्र जाधव, संजय सूर्यवंशी, तानाजी पवार , रवींद्र पवार, संदीप चव्हाण, विश्वास साळुखे, संभाजी माने, सै.फे. युथ संघटक व शहीद जवान वीर पुत्र सुरज जगताप, कराड तालुका अध्यक्ष महिला ब्रिगेड स्वाती बोराटे, कार्याध्यक्ष कल्पना शेवाळे, कार्याध्यक्ष संध्या भोसले, कराड तालुक्यातील उंब्रज, पाली, मसूर, कोपर्डे, सैदापुर, रेठरे, कार्वे, वारुंजी, काले, विंग, येळगाव या सर्व विभागातील आजी-माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, शहीद जवानांचे कुटुंबीय बहुसंख्येने उपस्थित होते.