कॉ. धनाजी गुरव यांना श्रमप्रतिष्ठा तर कॉ. नजूबाई गावित यांना कर्तुत्ववान महिला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर – changbhalanews
Uncategorized

कॉ. धनाजी गुरव यांना श्रमप्रतिष्ठा तर कॉ. नजूबाई गावित यांना कर्तुत्ववान महिला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

वाझर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत २५ नोव्हेंबरला वितरण

चांगभलं ऑनलाइन | पलूस
वाझर ता. पलूस येथील श्रमिक कष्टकऱ्यांचे आदर्श प्रतीक कॉम्रेड बळवंतराव शिरतोडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा यंदाचा बारावा कॉम्रेड बळवंतराव शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते व धरणग्रस्तांच्या लढ्यासाठी पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून जीवन वाहिलेले कॉम्रेड धनाजी गुरव यांना जाहीर झाला आहे. तर पाचवा कॉम्रेड गिताबाई शिरतोडे कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार आदिवासी चळवळीत गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ काम करणाऱ्या महाराष्ट्रातील लढाऊ आदिवासी नेत्या, जगातील पहिल्या आदिवासी लेखिका कॉम्रेड नजूबाई गावित यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे प्रमुख प्रा. डॉ. बाबुराव गुरव, कॉम्रेड मारुती शिरतोडे यांनी दिली.

वाझर येथील सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड मारुती शिरतोडे यांनी आपल्या माता-पित्यांच्या स्मृती प्रित्यर्थ पलूस, खानापूर, कडेगाव, तासगाव तालुका परिवर्तनवादी चळवळ, समाजवादी प्रबोधिनी परिसर शाखा, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड यांच्या सहभागाने कॉम्रेड बळवंतराव शिरतोडे श्रमप्रतिष्ठा पुरस्कार व काॅम्रेड गिताबाई शिरतोडे कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार हा कष्टकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना देऊन जाहीर परिसंवादाद्वारे समाज प्रबोधनाचा जागर गेली बारा वर्षे अखंडपणे सुरु ठेवलेला आहे. यंदा विद्यार्थी दशेपासून फुले,शाहू, आंबेडकर, मार्क्स लेनिन या महामानवांच्या विचारांची साथ सोबत घेऊन निपाणीचे तंबाखू आंदोलनापासून अनेक कष्टकरी, भुमिहीन, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त, आदिवासी अशा राबणाऱ्या बहुजन समाजातील प्रश्नांच्या चळवळीत योगदान देणारे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्याध्यक्ष काॅ. धनाजी गुरव यांना श्रमप्रतिष्ठा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर १९७२ च्या दुष्काळापासून आदिवासींचे दुःख , दारिद्र्य दूर करण्यासाठी ज्यांनी वैशिष्ट्यपूर्ण लढे दिले, उकाई धरणाच्या पुनर्वसनाचा लढा, आदिवासींच्या रोजगार हमीच्या कामासाठीचा लढा , लाठी पाडा धरणाचा कालव्यासाठीचा लढा ,जंगल जमिनीवर आदिवासींचा हक्क सांगण्याचा लढा, आदी लढे उभारणाऱ्या तसेच गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ आदिवासींच्यासाठी चळवळी उभ्या करणाऱ्या कॉम्रेड नजुबाई गावित यांना काॅ. गिताबाई शिरतोडे कर्तुत्ववान महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रोख रक्कम, मानपत्र , सन्मानचिन्ह, शाल , श्रीफळ व पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा आ. अरुणअण्णा लाड यांच्या हस्ते तर ज्येष्ठ विचारवंत भाई व्ही. वाय. आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २५ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता वाझर येथे संपन्न होणार आहे. तसेच या पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘भारत काल, आज आणि उद्या’ या विषयावर जाहीर परिसंवाद होणार आहे. आतापर्यंंत आयटकचे नेते कॉम्रेड तानाजी ठोंबरे , कॉम्रेड गोविंद पानसरे, क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर, ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.बाबुराव गुरव , सत्यशोधक कष्टकरी सभेचे कॉम्रेड किशोर ढमाले, माजी आमदार बिडी कामगारांचे नेते कॉम्रेड नरसय्या आडम, प्रख्यात पत्रकार संजय आवटे, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे , डॉ. भारत पाटणकर, भाई संपतराव पवार, महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार कॉम्रेड विनोद निकोले, कॉम्रेड स्मिता पानसरे, सेझविरोधी आंदोलनाच्या नेत्या कॉम्रेड उल्का महाजन , समाजशास्त्रज्ञ कॉम्रेड डॉ. गेल ऑम्लेट, पर्यावरणवादी नेत्या सुनीती सु. र. आदींना हे पुरस्कार दिले असल्याचे प्रा. बाबुराव गुरव व काॅ. मारुती शिरतोडे यांनी सांगितले. यावेळी सुनिल गुरव, बाबासाहेब लाड, दगडू जाधव, हिम्मतराव मलमे, सुनिल दळवाई, महेश मदने, विशाल शिरतोडे, विक्रम शिरतोडे, वैभवराज शिरतोडे उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close