चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड शहरातील दत्त चौकात दिवाळीची लगबग सुरू असतानाच सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास १८ वर्षीय युवकावर धारदार कोयत्याने सपासप वार करून खुनी हल्ला करण्यात आला. ओम गणेश बामणे वय १८, रा. भाजी मंडई, कराड असे या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान , याप्रकरणी हल्लेखोरांमधील एका संशयितास पोलिसांनी धाडसाने त्याच्याकडील कोयत्यासह ताब्यात घेतले आहे. अन्य संशयितांचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड शहरात सर्वत्र दिवाळी सणाची लगबग सुरू आहे. दत्त चौक परिसर गजबजून गेला आहे. सोमवारी रात्री प्रत्येकाची घराकडे जाण्याची घाई गडबड सुरू असताना दत्त चौक परिसरात ओम बामणे या १८ वर्षीय युवकावर धारदार कोयत्याने सपासप वार करून खुनी हल्ला करण्यात आला. त्यामुळे एकच पळापळ झाली. बघता-बघता घटनास्थळी मोठी गर्दी जमली. नागरिकांच्या मदतीने जखमी ओम बामणे याला सुरुवातीला शहरातील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे व त्यांचे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने हल्लेखोरा मधील एका संशयतास त्याच्याकडील कोयत्यासह ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू होती. याबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता, त्यामुळे अधिकचा तपशील समजू शकला नाही.
जखमी व हल्लेखोर एकाच परिसरातील…
या हल्ल्यात जखमी झालेला ओम बामणे शहरातील भाजी मंडई परिसरात राहतो. तर पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित युवक हाही भाजी मंडई परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोणत्या कारणावरून हा हल्ला झाला असावा याबाबत वेगवेगळ्या चर्चा शहरात सुरू आहेत. मात्र चौकशीनंतर याबाबतची माहिती समोर येईल असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.