काय म्हणताय काय! 100 रूपयांत ‘100 दिवाळी अंक”
कराडच्या 'या' ग्रंथालयाने सुरू केलीय अभिनव योजना
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
आज-काल भरमसाठ दिवाळी अंक निघत आहेत. रंगीबेरंगी पानं आणि नजरेत भरणारी आकर्षक मुखपृष्ठं, देशो-देशीच्या कथा अन् विषयांना नाही मर्यादा, अशी स्थिती आहे. मात्र बहुतांशी अंकांच्या किंमती 50 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहेत. त्यात आला मोबाईलचा जमाना! त्यामुळे वाचनाची भूक अनेकजण ऑनलाईनच भागवतात. बाजारातले अंक विकत घेतले तरी महागड्या किमतींमुळे वाचक फार..फार तर दोन ते तीन अंकापेक्षा जास्त अंक विकत घेण्याची शक्यता कमीच असते. मात्र 1 रुपयात एक दिवाळी अंक वाचता आला तर…तर मग वाचक वाचनाची दिवाळीच साजरी करणार. विश्वास बसत नसला तरीही तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. कारण ही खरीखुरी योजना कराड परिसरातील एका ग्रंथालयानं यंदा प्रत्यक्षात सुरू केलीयं.
सैदापूर-विद्यानगरातलं ‘समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालय’ असं ही योजना सुरू करणाऱ्या ग्रंथालयाचं नाव आहे. नुकतंच ग्रंथालयात या योजनेचं वाचकांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं. यावेळी प्रा. दादाराम साळुंखे यांनी या योजनेची माहिती वाचकांना दिली.
पहिला दिवाळी अंक निघाला त्याला झाली 115 वर्षे…
ते म्हणाले, ” दिवाळी हा संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जाणारा भारतीयांचा सण आहेः या निमित्ताने नवीन कपडे, फटाके, नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. खऱ्याखुऱ्या वाचकांना मात्र दिवाळी सणात दिवाळी अंकांचे वेध लागलेले असतात. दिवाळी अंकांना फार जुनी परंपरा आहे. 1909 साली पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध झाला होता. त्याचं नाव ‘मनोरंजन’ असं होतं. त्याला जवळपास 115 वर्षे झाली आहेत. आपल्या राज्यात दरवर्षी वेगवेगळ्या विषयावर जवळपास 1000 च्या आसपास दिवाळी अंक प्रकाशित होतात. या दिवाळी अंकांची वाचकांना खास मेजवानी असते.
गोखले ग्रंथालय देणार 100 रूपयांत 100 दिवाळी अंक…
“बाबुराव गोखले ग्रंथालयाने वाचकांसाठी शंभर रुपयात 100 दिवाळी अंक ही वाचनाची अभिनव योजना राबवून वाचकांना मुबलक वाचनाची संधी दिली आहे. वाचन संस्कृती लोप पावत असताना पुन्हा सर्वांना वाचन संस्कृतीकडे घेऊन जाण्याचं काम दिवाळी अंकच करतील, ” असं दादाराम साळुंखे यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
यावेळी या योजनेत सहभागी झालेल्या सभासदांना वाचनासाठी दिवाळी अंकांचे वाटप करण्यात आले. नजमा तांबोळी, मारुती लोहार, महादेव कांबळे, प्रा. गणेश लोहार, प्रा. ऐवळे, प्रा. अल्केश ओव्हाळ,आर्या भोसले, धनंजय किराणे, विवेकानंद मुळे, सीमा कांबळे, ग्रंथपाल रुकसाना नदाफ, अविनाश रोडे तसेच वाचक, सभासद उपस्थित होते. ग्रंथालयाच्या अध्यक्षा कांचन धर्मे यांनी आभार मानले.