कराड तालुक्यातील चोरट्याकडून चोरीच्या तब्बल 11 दुचाकी जप्त
चांगभलं ऑनलाइन | कोरेगाव
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी दोन सराईत दुचाकी चोरट्यांना अटक करून त्याच्याकडून तब्बल 3 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या अकरा मोटरसायकली हस्तगत करून जप्त केल्या आहेत.
याबाबत पोलिसांकडील माहिती अशी, कोरेगांव पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याबाबत सखोल तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी कोरेगाव पोलिसांना दिले होते. त्याप्रमाणे कोरेगाव विभागाचे पोलीस उपाधीक्षक राजेंन्द्र शेळके व कोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांचे मार्गदर्शनाखाली कोरेगांव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, राहुल कुंभार, समाधान शेडगे, गणेश शेळके, गणेश भोंग, अनिकेत जाधव, प्रमोद जाधव, प्रविण माने यांचे पथकाने कोरेगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोटरसायकल चोरास पकडण्याचे शोध कार्य सुरु केले.
खबऱ्याकडून सातारारोड ता. कोरेगाव जि.सातारा गावचे हद्दीत एस टी स्टॅण्ड परिसरात दोनजण चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी येणार आहेत, अशी गोपनीय माहीती पोलिसांना मिळाली. त्यावरून सदर ठिकाणी सातारारोड गावचे हद्दीत एस टी स्टॅण्ड परीसरात सापळा रचुन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत 1 ) निखिल सुरेश सपकाळ वय 23 वर्षे 2) सुशांत शंकर पवार वय 25 वर्षे दोघे रा. निगडी ता. कराड जि.सातारा अशी त्यांची नावे असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्या ताब्यातील दुचाकीची चौकशी केली असता सदरची मोटरसायकल हि कोरेगांव पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पोलीस ठाणेत आणुन विश्वासात घेवुन अधिक चौकशी केली असता त्यांनी सातारा, सांगली, पुणे जिल्हा हद्दीतुन व इतर ठिकाणाहुन एकुण अकरा मोटरसायकलची चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही संशयितांकडून एकुण 3 लाख 20 हजार रु. किंमतीच्या अकरा मोटरसायकली हस्तगत करून जप्त केल्या. दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
ही कामगिरी पोलीस उपाधीक्षक राजेन्द्र शेळके, कोरेगांवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगांव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, राहुल कुंभार, समाधान शेडगे, गणेश शेळके, गणेश भोंग, प्रमोद जाधव, अनिकेत जाधव, प्रविण माने यांच्या पथकाने केली आहे. दरम्यान , पोलिसांनी उघडकीस आणलेला हा मोटरसायकल चोरीचा जिल्ह्यातील मोठा गुन्हा असल्याचे बोलले जात आहे.