चांगभलं ऑनलाइन | जयसिंगपूर
यंदा तोडणीस जाणाऱ्या उसाला साखर कारखान्यांनी पहिली उचल प्रति टन 3500 दिली पाहिजे. ती अगोदर जाहीर करावी मग तोडण्या सुरु कराव्यात. मागील दुसरा हप्ताही चारशे रुपये प्रमाणे तातडीने द्यावा, अशा मागण्या करून या मागण्यांसाठी दिवाळीपर्यंत जयसिंगपुरातच ठिय्या मांडणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज जयसिंगपूर येथे 22 व्या ऊस परिषदेत केली.
शेट्टी म्हणाले, पाच वर्षांपूर्वी उसाचा उत्पादन खर्च 1927 रुपये होता, त्यावेळी 2800 रुपये दर घेतला आहे. यावर्षी उत्पादन खर्च 2632 रुपये आहे मग 3000 दर कसा परवडेल? त्यामुळे पहिली उचल प्रति टन 3500 रुपये देण्याची आमची मागणी योग्य आहे. तसेच मागील तुटून गेलेल्या ऊसाला दुसरा हप्ता म्हणून चारशे रुपये प्रमाणे जाहीर करून सभासदांच्या खात्यावर वर्ग करावा. अनेक साखर कारखाने पुढचं काय ते बघूया, मागचं काय काढू नका असे म्हणत आहेत. ते चुकीचं आहे.
साखर कारखानदार म्हणतात की मी कर्नाटकातल्या साखर कारखान्यांना सोपं जावं म्हणून ऊस दर आंदोलन करतोय, पण मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही अगोदर मागील तुटून गेलेल्या उसाला चारशे रुपये द्या, मग कर्नाटकातला सगळा ऊस महाराष्ट्रात आणायची जबाबदारी आमची, असं आश्वासनंच राजू शेट्टी यांनी राज्यातल्या साखर कारखानदारांना जाहीरपणे दिलं.
काही साखर कारखान्यांनी बिलाशिवाय साखर विकली, तेंव्हा जीएसटी विभाग काय झोपा काढत होता का, असा सवाल करून राजू शेट्टी पुढे म्हणाले, काही साखर कारखान्यांनी तर नातेवाईकांच्या नावाने असलेल्या ट्रेडिंग कंपनीला कमी दरात साखर विकली आहे, याची चौकशी झाली पाहिजे.
मागील हप्त्याच्या चारशे रुपये दरासाठी 17 ऑक्टोंबर पासून 522 किलोमीटर चालून 37 साखर कारखानदारांना निवेदन देऊन आलोय, त्यामुळे मागील चारशे रुपये अगोदर साखर कारखानदारांनी जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले पाहिजेत, असे सांगून राजू शेट्टी म्हणाले की, आपल्या मागण्यावर जोपर्यंत साखर कारखानदार व सरकारचा निर्णय होत नाही, तोपर्यंत मी जयसिंगपुरातून हलणार नाही. दिवाळीपर्यंत जयसिंगपूरात ठिय्या मांडणार आहे. शेतकऱ्यांनी आता दिवाळीला खर्डा-भाकरी अन कांदा कारखान्याच्या चेअरमनला नेऊन द्यायचा, असं आवाहनही राजू शेट्टी यांनी केलं.