शेतात अंतर्गत मशागतीसाठी ‘पाॅवर टिलर’ वापरला जातो. शेतकरी त्याला ‘हॅन्ड रोटर’ असेही म्हणतात. हा चालवणं तसं तितकं सोपं नसतं. त्यासाठी दणकट मनगटाचा मातीचा अन् जातीचा ‘पाॅवरफुल’ शेतकरी असावा लागतो. राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे राजकारणात असले तरी असेच पाॅवरफुल शेतकरीही आहेत. त्यांच्या दरे या गावी हळदीच्या शेतात ते पाॅवर टिलर चालवत असताना हे दृश्य संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळालं. नाती सर्वजणच जपतात, पण शेती आणि मातीला जीवापाड जपणारे मुख्यमंत्री या निमित्ताने उभ्या महाराष्ट्राला पहायला मिळाले.
याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून सांगितलं की, “गावी आलो की माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेती आणि माती यांच्याशी माझे नाते घट्ट आहे.”
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे मूळ गाव. ते नेहमीच आपल्या या गावी येत असतात. गावी आले की ते नेहमीच शेतीमध्ये रमलेले पहावयास मिळतात. त्यांचे शेतीचे ज्ञानही चांगले आहे. ते स्वतः शेतामध्ये अनेक कामे करत असतात.
दरे येथील शेतामध्ये त्यांनी अनेक प्रकारची पिके, फळ झाडे लावली आहेत. त्यामध्ये आंबा, सुपारी, नारळ, केळी, पेरू, संत्री, मोसंबी, आवळा यासह सफाचांदांची ही लागवड केली आहे. तसेच कॉफी, हळद, अगरवूड, चेरी, लिची, अवोकाडो आणि बांबूचीही लागवड केली आहे. चंदन, रक्त चंदन, मत्स्य शेती, ग्रीन हाऊस, शेळी पालन, गो शाळा ही उभी केली आहे. अनेक प्रकारचे मसाला पिकेही त्यांनी जोपासली आहेत.
याविषयी बोलताना मुख्यमंत्री श्री शिंदे सांगतात “कोयना खोऱ्यातील ही जमीन सोने पीकवणारी आहे. सर्व प्रकारची पिके या जमिनीमध्ये येतात. अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांनी शेती करावी. विशेषतः गट शेतीच्या माध्यमातून विविध प्रयोग करून समृध्द शेती करावी. बांबू लागवडीकडेही शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पीक आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी.”
शेतीचा विषय निघाला की मुख्यमंत्री श्री शिंदे भरभरून बोलताना दिसतात. यातून त्यांची शेतीची आवड दिसून येते. त्यांना शेतीतील नवनवीन प्रयोग पहावयास नेहमीच आवडते. शेतीमध्ये रमणारे असे महाराष्ट्राचे कदाचित पहिलेच मुख्यमंत्री आहेत. गावी आले आणि शेतात काम करू लागले की त्यांचे शेतकऱ्याचे रुप अनेकांना प्रेरणा देणारेच असते. राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांचा हा आदर्श घेऊन शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करावेत.
– हेमंतकुमार चव्हाण, माहिती अधिकारी, सातारा