चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न करून सोनसाखळी जबरीने चोरणा-या सराईत दोन गुंडांना कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने शिताफीने जेरबंद करून त्यांच्याकडील हत्यार व रोकड, सोन्याची चेन असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत कराड शहरातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने कंबर कसली आहे. गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे व गुन्हेगारी समुळ उच्चाटन करण्याचे कार्य कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजु डांगे व त्यांचे पोलीस टीमने सुरू केले आहे.
मलकापूर शहरातील गोविंद बाबुराव पवार हे दि. 19 ऑक्टोबर 2023 रोजी रात्रीचे जेवणानंतर फेरफटका मारत होते. यावेळी मलकापुर ता. कराड शहराच्या हद्दीत हॉटेल सफायरजवळ रोडवर अनोळखी इसमाने त्यांना अडवून कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पवार यांच्या गळ्यातील सुमारे ५ तोळे सोन्याची चेन हल्लेखोर जबरीने तोडुन चोरुन नेत असताना गोविंद पवार यांनी आरडाओरडा करून चेन हाताने पकडली. त्यामुळे चेन तुटून सुमारे ३ तोळे ३ ग्रॅम वजनाची व अंदाजे 1 लाख 32 हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन चोरटयाने तोडुन जबरीने चोरुन नेली. याबाबत कराड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी यांनी डी. बी. प्रमुख उपनिरीक्षक राजू डांगे व त्यांच्या डी. बी. टीमला आदेश दिला होता. फिर्यादीने चोरटयाचे दिलेले वर्णनावरून व गोपनीय बातमी मिळवून डीबीच्या पोलीस पथकाने रेकॉर्डवरील संशयीत अशोक नंदाप्पा बिराजदार रा. शनिवारपेठ, कराड व जावेद गणी सुतार रा. रत्नागिरी गोडावूनचे मागे कराड या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल तपास केल्यावर त्यांनी गुन्हा केलेची कबुली दिली असून त्यांनी गुन्ह्यातील चोरलेला सोनसाखळी हस्तगत करण्यात आलेली आहे. याशिवाय दोन्ही संशयितांकडून कराड शहर आणखी एका गुन्हेतील चोरीची व 20 हजार रुपये किंमतीची जुपीटर मोटार सायकल तसेच आणखी एका चोरीच्या गुन्ह्यात पानटपरीतून चोरलेल्या साहित्यांपैकी काही साहीत्य असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, कराड विभागाचे उपाधीक्षक अमोल ठाकुर, व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजीराव विभुते, पोलीस उपनिरिक्षक आर.एल.डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, प्रशांत वाघमारे , महिला पोलीस सोनाली पिसाळ यांच्या पथकाने केली आहे.