चांगभलं ऑनलाइन | कराड
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील 4 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या चूरशीने लढत झाली. त्यापैकी 3 ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसने आपले वर्चस्व राखले आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि अॅड उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या गटाने सत्ता मिळवत कराड दक्षिण मधील आपले वर्चस्व कायम राखले आहे. फक्त रेठरे बु या एकाच ग्रामपंचायत मध्ये अपेक्षेप्रमाणे भाजप ची सत्ता कायम राहिली आहे. यापरिस्थितीत सुद्धा आ. पृथ्वीराज चव्हाण गटाचे सरपंच पदाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांनी चुरशीची लढत देत 2200 मते मिळवली तसेच अपक्ष उमेदवार धनंजय मोहिते यांना 400 मते मिळाली.
कराड दक्षिण मधील जिंकलेल्या तीनही ग्रामपंचायतीच्या उमेदवारांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी येऊन जल्लोष करून गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी युवानेते इंद्रजीत चव्हाण यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करीत सत्कार केला.
कराड दक्षिण मधील शेळकेवाडी ग्रामपंचायतीच्या आठही जागा आ.पृथ्वीराज चव्हाण आणि अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर गटाने राखल्या. सरपंचपदी प्रकाश तुकाराम शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. येवतीत आ.पृथ्वीराज चव्हाण आणि अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर गटाच्या भैरवनाथ रयत पॅनेलने ग्रामपंचायतीच्या 10 पैकी 9 जागा जिंकल्या. विरोधातील भाजपच्या डाॅ. अतुल भोसले गटाच्या भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. सरपंचपदी बाबा-दादा गटाच्या हिराबाई भगवान गुरव यांनी विजय मिळवला. तसेच येणपे ग्रामपंचायतीच्या सर्वच्या सर्व 12 जागांवर आ.पृथ्वीराज चव्हाण आणि अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर गटाने विजयी मिळवल्या. येथे सरपंचपदी मनीषा प्रताप शेटे यांची वर्णी लागली.