चांगभलं ऑनलाइन | कराड
तुटून गेलेल्या ऊसाला दुसरा हप्ता चारशे रुपये प्रमाणे मिळाला पाहिजे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आक्रोश पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर आता सातारा जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कराड तालुक्यातील तासवडे पुलावर सह्याद्री साखर कारखान्याकडे जाणारी तर इंदोली येथे जयवंत शुगर साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला .
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कारखाना प्रशासनास तुटून गेलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता 400 रूपये प्रमाणे व यावर्षीचा ऊस दर जाहीर करण्यास दि.8 नोव्हेंबर पर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुदत दिली आहे. उद्या राजू शेट्टी ऊस परिषद घेणार आहेत. त्यानंतर अतिशय तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष राजू शेळके, उपाध्यक्ष दादासाहेब यादव. स्वाभिमानी पक्ष जिल्हा अध्यक्ष देवानंद पाटील. तालुका अध्यक्ष प्रमोद जगदाळे. अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, बापू साळुंखे, रामभाऊ साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.
जिल्हाध्यक्ष आले चाबूक हातात घेऊन…
सोमवारी स्वाभिमानी शेतकरी ऊस वाहतूक रोखली. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील हे चाबूक हातात घेऊन आले होते. त्यांनी चाबकाचे फटके हवेत ओढून इशारा दिला.