रेठरेला भाजप, हेळगाव, टेंभूला राष्ट्रवादी, येवती-येणपं काॅंग्रेसकडं
कराड तालुक्यात पारंपरिक गटांनी 'गड' राखलं
चांगभलं ऑनलाइन | कराड
कराड तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये रेठरे बुद्रुक येथे भाजपने, हेळगाव, टेंभूसह 8 गावात राष्ट्रवादीने (शरद पवार गट), तर येवती, येणपे, शेळकेवाडी या तीन गावात राष्ट्रीय काँग्रेसने आपली सत्ता कायम ठेवली. त्यामुळे तालुक्यातील भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपआपले गड कायम ठेवले असल्याचे समोर आले.
कराड तालुक्यातील बारा ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी येथील प्रशासकीय इमारतीमध्ये सुरुवात झाली. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या निवडणुकीचे निकाल घोषित होऊ लागल्यानंतर कार्यकर्ते जल्लोष करत आपापल्या गावाकडे परतले.
रेठरेवर भाजपची निर्विवाद सत्ता…
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या बहुचर्चित रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासह सर्व 18 जागा भाजपच्या डॉ. अतुल भोसले यांच्या गटाच्या कृष्णा विकास आघाडीने जिंकून गावात सत्ता कायम ठेवली. सरपंच पदाचे उमेदवार हणमंत बाबुराव सूर्यवंशी हे विजयी झाले. काँग्रेस सह महाविकास आघाडीच्या पॅनलला येथे पराभव पत्करावा लागला.
येवती, येणपे, शेळकेवाडी राष्ट्रीय काँग्रेसकडं…
येणपे येथे काँग्रेसच्या अॅड. उदयसिंह उंडाळकर व आ. पृथ्वीराज चव्हाण गटाने सरपंच पदासह 11 जागा जिंकून वर्चस्व कायम ठेवले. भाजपला 1 जागेवर समाधान मानावे लागले. सरपंच पदाच्या उमेदवार मनीषा शेटे विजयी झाल्या. येवती गावात एक जागा वगळता राष्ट्रीय काँग्रेसच्या दादा, बाबा गटाने सरपंचपदासह सर्व जागांवर विजय मिळवून सत्ता कायम ठेवली. शेळकेवाडी येथेही दादा व बाबा गटाने सर्वच्या सर्व जागा जिंकून सत्तेवर वर्चस्व कायम ठेवले.
उत्तरेत आ. बाळासाहेब पाटील यांचा ‘गड’ अभेद्य…
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आ. बाळासाहेब पाटील यांच्या गटाने हेळगाव, टेंभू सह कराड उत्तर मधील तब्बल आठ गावांमध्ये सत्ता कायम राखली. हेळगाव येथे सरपंच पदासह 10 पैकी 9 जागा आमदार गटाच्या सह्याद्री पॅनलने जिंकल्या तर एका जागेवर विरोधी गटाला समाधान मानावे लागले. टेंभू येथेही आमदार बाळासाहेब पाटील गटाने सर्वच्या सर्व जागा जिंकून सत्ता कायम ठेवली. भोसलेवाडी येथेही आ. बाळासाहेब पाटील गटाने वर्चस्व कायम राखले आहे.
निकालानंतर कार्यकर्त्यांची बाचाबाची…
मतमोजणीचे निकाल झाल्यानंतर तहसील कार्यालयासमोर टेंभू येथील कार्यकर्त्यांना गुलाल उधळण्यावरून पोलिसांनी रोखले. यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली तर निकालानंतर रेठरे बुद्रुक येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून जल्लोष करत मिरवणूक काढली. त्यांची छ. शाहू चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याबरोबर बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.