चांगभलं ऑनलाइन | मुंबई
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक आज मुंबई येथे पार पडली. त्यामध्ये कायदेशीर बाबी पूर्ण करूनच मराठा समाजाला आरक्षण दिले जाऊ शकते आणि त्यासाठी योग्य वेळ द्यायला हवा, यासह मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व त्यांचे उपोषण पाठीमागे घ्यावं असा ठराव करण्यात आला.
“” मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र, त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे. हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते श्री. मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.” असा ठराव आज मंत्रालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला.
या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांच्यासह आ. विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, अनिल परब, जयंत पाटील (शे.का.प.), सुनिल प्रभु, सुनील तटकरे, डॉ प्रशांत इंगळे (बीएसपी), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, आ. बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजेश टोपे, कपिल पाटील, सदाभाऊ खोत, प्रा जोगेंद्र कवाडे, रेखा ठाकूर, सुलेखा कुंभारे, राजेंद्र गवई, गौतम सोनवणे, रवी राणा, मंत्री चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील , गिरीश महाजन, संजय शिरसाट, राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे आदी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.