14 दिवस अन् 300 किमी अंतर चालल्यानंतर ‘मराठा आरक्षणा’साठी थांबला ‘हा’ नेता! – changbhalanews
राजकियराज्यशेतीवाडी

14 दिवस अन् 300 किमी अंतर चालल्यानंतर ‘मराठा आरक्षणा’साठी थांबला ‘हा’ नेता!

चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके


ऊसाचा दुसऱ्या हप्ता 400 रूपये द्यावा, या मागणीसाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या परिसरातून गेली 14 दिवस सुरू असलेली आक्रोश पदयात्रा तब्बल 300 किलोमीटर अंतर चालल्यानंतर सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी करमाळा येथे थांबवण्याचा निर्णय घेतला. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आणि राज्य व केंद्र सरकारचा निषेध म्हणून हा निर्णय घेत असल्याचे शेट्टी यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

यावेळी माजी खा. शेट्टी म्हणाले, मराठा समाज आंदोलनाच्या चळवळीतील माझे सहकारी मनोज जरांगे – पाटील यांची तब्येत खालावली असून त्यांच्या या लढ्यास पाठिंबा देण्यासाठी मी गेल्या 14 दिवसापासून सुरू असलेली ऊस उत्पादक शेतक-यांची आक्रोश पदयात्रा आजपासून स्थगित करत आहे.‌ मराठा समाज आरक्षणाच्या ठोस निर्णयानंतर पुन्हा आक्रोश पदयात्रा करमाळे ता. शिराळा या ठिकाणाहून सुरू होईल.

गेल्या 14 दिवसात जवळपास 300 किलोमीटर पेक्षा जास्त पदयात्रा पुर्ण झालेली असून पुढील भुमिका मराठा समाजाच्या आंदोलनानंतर लवकरच जाहीर करून तोपर्यंत आक्रोश पदयात्रा स्थगित राहील, असं शेट्टी यांनी सांगितलं.

गनिमी कावा सुरू राहणार

साखर कारखानदारांनी तुटून गेलेल्या उसाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम जाहीर न करता 1 नोव्हेंबर पासून गळीत हंगाम सुरू करण्याचे नियोजन केले आहे. मात्र दुसरा हप्ता 400 रूपये प्रमाणे जाहीर करावा यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन गनिमी कावा पद्धतीने सुरू राहील, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

सोशल मीडियावर शेट्टींच्या निर्णयाचे स्वागत

सोशल मीडियावर राजू शेट्टी यांच्या मराठा आरक्षणासाठी आक्रोश यात्रा स्थगित करण्याच्या निर्णयाचं नेटिझन्सनी स्वागत केलं आहे. “लढा कुणब्यांचा,,,! प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणारे दोन नेतृत्व म्हणजे मनोज जरांगे-पाटील व राजू शेट्टी. यांनी रस्त्यांवरील चळवळीची लढाई चालू ठेवली आहे, जी की प्रस्थापितांना एक ‘धडकी भरवणारी आहे. मराठ्यांना सरसकट कुणबीचा दाखला देण्यात यावा व यासाठी मनोज जरांगे यांनी जालन्यात अंतरावरील सराटी या छोट्या गावातून आमरण उपोषण सुरू ठेवलं आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात त्याच कुणब्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टींनी दिग्गज कारखानदारांच्या विरोधात उसाच्या 400 रूपयांच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 22 दिवस चालणारी आक्रोश पदयात्रा काढली आहे. रस्त्यावरवरील ही चळवळ म्हणजे भुकंपाची ठिकाणं आहेत. एकाचा मराठावाडा-जालना तर दसऱ्याचा पश्चिम महाराष्ट्र असे दोन वेगवेगळे केंद्रबिंदू आहेत. असे असले तरि हेतू एक समान आहे. कुणब्यांचं हित! म्हणून गट-तट पक्ष न मानता चळवळ हेच बळ मानुन महाराष्ट्रतील सर्व जनतेननं यांना पाठिंबा देवून चळवळीत सामील होवू या!! कुणबी हिताय… कुणबी सुखाय!!!” अशी प्रतिक्रिया एका नेटिझन्सने व्यक्त केली आहे.

इस्लामपूरला आंदोलनस्थळी भेटून पाठिंबा

सकल मराठा समाज वाळवा तालुक्याच्यावतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इस्लामपूर येथे शेतकरी नेते बी. जी. पाटील यांनी गेल्या काही दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषण स्थळी आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. यावेळी आंदोलनकर्त्यांशी त्यांनी विविध विषयावर चर्चा केली.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close