चांगभलं ऑनलाइन | कराड
मराठा समाजाला सरसकट कुणबीचे दाखले मिळावेत आणि ओबीसी मधून 50 टक्केच्या आतील आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज कराड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी “आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं” अशा घोषणांनी कराड शहर दणाणून गेलं.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं आणि ओबीसी प्रवर्गातून 50 टक्केच्या आतील टिकणार आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. या मागणीला पाठिंबा म्हणून कराड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज सोमवारी कराड तहसील कार्यालयावर मोर्चाचा आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी शिवतीर्थ दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या मोर्चाला सुरुवात झाली. भगवे झेंडे हातात घेतलेले आणि भगव्या टोप्या परिधान केलेले युवक मोर्चात अग्रस्थानी होते. मोर्चासाठी लाखोंचा विराट जनसमुदाय उपस्थित होता.
शिवतीर्थ दत्त चौक – चावडी चौक – जोतिबा मंदिर – आंबेडकर पुतळा – महात्मा फुले पुतळा – चर्च – हेड पोस्ट – बस स्टँड – शिवतीर्थ या मार्गाने मोर्चा तहसीलदार कार्यालयासमोर आला.
जोरदार घोषणाबाजी
आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, जारांगे-पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, कोण म्हणतंय देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही, तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय, ५०% च्या आतील ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा जोरदार घोषणा यावेळी मराठा समाज बांधवांकडून देण्यात आल्या. या घोषणांनी कराड शहर दणाणून गेले. यावेळी आरक्षणाच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार विजय पवार यांना देण्यात आले.
तीन युवक चढले टॉवरवर
मोर्चा मधील सहभागी मराठा बांधव तहसील कार्यालयापासून परतत असताना दत्त चौकात मोर्चात सहभागी झालेल्यांपैकी तीन युवक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पाठीमागील बिल्डिंगवर फ्लेक्स बॅनर साठी उभा केलेल्या टॉवरच्या टोकावर चढले होते. जमिनीपासून हा टॉवर खूप उंचावर आहे. त्यामुळे ते तरुण खाली उडी मारतात की काय अशी भीती निर्माण झाली होती. त्यामुळे मोठ्या तणाव निर्माण झाला होता. यावेळी दत्त चौकात मोठी गर्दी जमा झाली. लाऊड स्पीकर सिस्टीम वरून टावरवर चढलेल्या युवकांना खाली येण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले, काही वेळानंतर ते तीनही तरुण सुखरूप खाली उतरले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान मराठा समाजातील युवकांचा उद्रेक आणि त्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने सरकारपर्यंत मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पोहोचवावी, असं आवाहन यावेळी करण्यात आलं.