
चांगभलं ऑनलाइन | कराड
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांचे उपोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 30) येथील तहसील कार्यालयावर मराठ्यांचं वादळ धडकणार आहे. अंदाजानुसार सुमारे एक लाखांवर मराठा समाज बांधव या मोर्चाला येणार आहेत. कराड तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता दत्त चाैकातून मोर्चाला सुरूवात होणार आहे.
कोल्हापूर नाका येथील सोनाई मंगल कार्यालयात काल (गुरूवारी, दि 26 Oct) कराड तालुका (Karad Taluka) सकल मराठा मोर्चा समितीची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. कराड उत्तर व कराड दक्षिण तालुक्यातील सर्व गावांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी कराड तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार असून मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून कराड शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. कराड तालुक्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करून, प्रभातफेरी काढून जनजागृती केली जात आहे.
मोर्चाचा मार्ग असा राहील…
सकल मराठा समाजाने सकाळी 10 वाजता कराड शहरातील दत्त चाैक येथे एकत्रित यायचे आहे. तेथून दत्त चाैक- चावडी चाैक- जोतिबा मंदिर- आंबेडकर पुतळा- काॅटेज हाॅस्पीटल- विजय दिवस चाैक- कराड बसस्थानक- दत्त चाैक व पुढे तहसील कार्यालय असा मोर्चाचा मार्ग असणार आहे.
पार्किंगसाठी अशी व्यवस्था…
तांबवे, सुपने, उंब्रज, वहागांव, तळबीड, चरेगाव येथून येणाऱ्या मराठा बांधवांनी दैत्य निवारणी मंदिर परिसरात वाहने पार्किंग करावी. विंग, कोळे, चचेगांव, येरवळे या भागातून येणाऱ्यांनी पंकज हाॅटेल पाठिमागे वाहने पार्किंग करावीत. काले, उंडाळे, ओंड, आटके, रेठरे, वाठार या परिसरातून येणाऱ्या बांधवांनी पी. डी. पाटील उद्यान परिसरात, वडगांव, शेरे, शेणोली, कार्वे, खुबी या परिसरातून येणाऱ्यांनी बाजार समिती- भेदा चाैक परिसरात तर करवडी, ओगलेवाडी, मसूर, कोपर्डे, अंतवडी, शामगाव, किवळ, शिरवडे परिसरातील बांधवांनी शिवाजी हायस्कूल- शिवाजी स्टेडियम परिसरात वाहने पार्किंग करावीत, असे अशी माहिती देण्यात आली आहे.