गोपीचंद पडळकरांची हिंदूस्थान शिव मल्हार क्रांती सेना – changbhalanews
राजकियराज्य

गोपीचंद पडळकरांची हिंदूस्थान शिव मल्हार क्रांती सेना

आरेवाडीच्या दसरा मेळाव्यात घोषणा

चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांच्यासह सर्व बहुजन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी हिंदुस्तान शिव मल्हार क्रांती सेना या अराजकीय संघटनेची घोषणा आरेवाडीच्या बनात भरलेल्या दसरा मेळाव्यातून केली. आरेवाडीतील बिरोबाच्या आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने ही घोषणा करतोय, असं ते म्हणाले. धनगर आरक्षणाचा लढा दोन टप्प्यावर तीव्र करण्याची हाक त्यांनी महाराष्ट्रातील समाज बांधवांना दिली.
या दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातून आलेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. तब्बल अर्धा तास केलेल्या भाषणातून त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला.

पडळकर म्हणाले म्हणाले, धनगर आरक्षणाची लढाई दोन टप्प्यावर लढली जात आहे. न्यायालयाने आठ डिसेंबर ११ डिसेंबर १५ डिसेंबर या तीन तारखा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंतिम सुनावणीसाठी दिलेल्या आहेत. नाताळाची सुट्टी झाल्यानंतर धनगर आरक्षणावर निकाल अपेक्षित आहे. बिरोबाचा आशीर्वाद असून धनगर आरक्षणाच्या बाजूने निकाल लागेल, याची मला खात्री आहे. मधु शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यादेवी होळकर विचार मंचाकडून यासाठी 170 पुरावे न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने धनगड या राज्यात अस्तित्वात नाहीत असे शपथपत्र दिलं आहे, ही जमेची बाजू आहे. तरीसुद्धा दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाला तर रस्त्यावरच्या लढाईसाठी धनगर समाजानं तयार राहिलं पाहिजे.

महाराष्ट्रात एकाने बहुजनांचा बुरखा पांघरलेला आहे. मात्र गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका शालिनीताई पाटील यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम घेतली तेंव्हा त्यांना पक्षातूनच काढलं गेलं. दोन-तीन महिन्यापूर्वी त्यांचा पुतण्या पार्टीतून फुटला, यामध्ये दुसऱ्यांचा काय दोष? पण हे सगळं खापर छगन भुजबळांच्यावर फोडून त्यांना शिव्याशाप देणं सुरू आहे, कारण त्यांना माहित आहे, छगन भुजबळ हा गरीब समाजातला माणूस आहे. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी उभा केलेली बहुजनांची चळवळ मोडून काढण्यात आली, त्यांना दाबायचा प्रयत्न झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचे तुकडे-तुकडे केले गेले. संघर्षयोध्दा गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले असते, वंजारी समाजाचा मुख्यमंत्री झाला असता, पण काही आमदारांना फूस लावून त्यांना या पदापासून वंचित ठेवण्यात आलं. हे षडयंत्र बहुजन समाजातील युवकांनी ओळखलं पाहिजे. स्वर्गीय बी. के. कोकरे यांची संघटना संपवण्याचं पाप केलं गेलं, शिवाजीराव शेंडगे बापूंना राजकारणात वापरून बाजूला करण्यात आलं. हे तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे, त्यामुळे या गुलामगिरीतून बाहेर पडलं पाहिजे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील एक गोष्ट सांगतो. शरद पवार यांच्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यात अडीच वर्ष सत्तेवर होतं. या काळात धनगर आरक्षणाच्या न्यायालयीन खटल्याच्या मदतीसाठी मधु शिंदे काही लोकांना घेऊन शरद पवार यांना भेटले. त्यांनी पवारांना सर्व माहिती दिली ती ऐकून घेतल्यानंतर पवार हळूच म्हणाले धनगर आणि धनगड यांच्याबाबतीत नेमकं काय आहे? त्यावर मधु शिंदे यांनी राज्यात धनगड अस्तित्वात नाहीत असे सांगून सर्व परिस्थिती सांगितली, मात्र तरीही पवार म्हणाले की 1981 मध्ये मला गडचिरोलीला एक धनगड भेटला होता. त्यावर मधु शिंदे यांनी एका माणसाला कुठे आरक्षण दिलं जातं का, त्याची बायको, पोरं, बाप, आई, आजोबा, मामा, मामी असं कोणी नाही का, असं पवारांना सांगितलं. म्हणजे या गोष्टीतून मला असं सांगायचं आहे की समाजात विष कशा पद्धतीने पेरलं जातंय हे आपण चौकस राहून बघितलं पाहिजे.

आम्ही धनगर आरक्षणासाठी चौंडीला उपोषण सुरू केलं. तर तिकडे लेक गेली आणि म्हणाली धनगरांना आरक्षण मिळाले पाहिजे. आणि लगेचच 1 आॅक्टोबरला आदिवासी हक्क परिषदेत बाप गेला अन म्हणाला की ‘आदिवासींमध्ये आम्ही कुणालाही येऊ देणार नाही-माननीय शरद पवार’. ही अशी लबाडी आता यापुढे चालायची नाही, धनगर सोशल मीडिया वापरतोय, मेंढका ट्विटरवर बोलतोय.

महाराष्ट्रातला धनगर आणि धनगड हा विषय जर शरद पवार मुख्यमंत्री असताना 1990 ला संपला असता तर आज आपल्याला महाराष्ट्रात संघर्ष करावा लागला नसता, तो 2019 ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिटवला. धनगड राज्यात अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत, असं शपथपत्रावर सरकारच्यावतीने लिहून दिलं. तेच 1990 ला झालं असतं तर 1995, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 या सगळ्या निवडणुकीत प्रत्येक वेळेला धनगरांचे 35 आमदार निवडून गेले असते. मात्र धनगर समाज एवढ्या आमदारांना प्रत्येक वेळी मुकला आहे. ‘जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी’ या तत्त्वाने समाजाला न्याय का मिळत नाही हे शोधलं पाहिजे.
राज्यातील 45 आदिवासींच्या जमातीपैकी 33 जमातींना अद्याप जातीचा दाखलाच देण्यात आलेला नाही, असा आरोप करून गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, अशी परिस्थिती असताना आम्ही संविधानाने दिलेल्या धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करतोय, पण त्याच्या आडवं येण्याची भाषा जर कोणी केली तर त्याला तुडवून जाण्याची आमची तयारी आहे.

मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर

महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीला आमचा पाठिंबा आहे. गरीब मराठा समाजाच्या योजनाही यांनीच बंद पडल्या. महाविकास आघाडीच्या काळात अण्णासाहेब पाटील महामंडळातून अडीच वर्षात कुणाला कर्ज मिळालं नाही, सारथीला निधी मिळाला नाही, महाज्योतीला पैसे दिले गेले नाहीत, हे सगळे प्रकार घडले.

सरकारने काही मागण्या निश्चित मान्य केल्या आहेत

सरकारनं धनगर समाजासाठी काही मागण्या मान्य केल्या आहेत. त्याचं मी निश्चित स्वागत करतो. मात्र सरकारने धनगर आरक्षणासाठी ताबडतोब कमिटी नेमावी, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, बिहार या राज्यांकडे कमिटीचा दौरा करून अहवाल तयार करावा. मेंढपाळांसाठी घोषणा केलेल्या निधीची अंमलबजावणी करण्यासाठी फेडरेशन तयार करावं. मेंढपाळांच्यासाठी स्वतंत्र कायदा व वनक्षेत्रातील चराईसाठी क्षेत्र ठेवावं. आरेवाडीचा बिरोबा, पट्टणकोडोलीचा बिरोबा, वाशीचा बिरोबा, महालिंगराया, हुन्नुरच मंदिर अशा पाच मंदिरांचा विकास आराखडा तयार करून त्यावर 200 कोटी निधीची तरतूद करावी. महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मगाव वाफगाव किल्ला सरकारने ताब्यात घेऊन, तेथे यशवंतराव होळकर यांच्या उंचीला साजेसे स्मारक उभा करावे अशा मागण्या आपण सरकारकडे केल्या आहेत.

हिंदुस्तान शिवमल्हार क्रांतीसेनेची घोषणा
मावळत्या सूर्याच्या आणि आरेवाडीच्या बिरोबाच्या साक्षीनं महाराष्ट्रातील तमाम बहुजनांना संघटित करण्यासाठी हिंदुस्तान शिव मल्हार क्रांती सेनेची घोषणा आपण करत आहोत , असं गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलं. या अराजकीय संघटनेचं मुख्यालय मुंबईत असेल आणि महाराष्ट्रातील गावागावात शाखा असतील, याशिवाय मेंढपाळांच्या प्रश्नासाठी ‘संत बाळूमामा मेंढपाळ संघटना’ ही आणखी एक संघटना कार्यरत राहील, असं पडळकर यांनी जाहीर केलं. 21 नोव्हेंबरपर्यंत धनगर आरक्षणाचा विषय मिटला नाही तर 11 डिसेंबरला नागपूरच्या अधिवेशनावर धनगर समाजाचा विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा पडळकर यांनी दिला.

एसटीडीच्या गुलामगिरीतून बाहेर पडा

सध्याचा जमाना 5 जी चा आहे, त्यामुळे एसटीडीच्या गुलामगिरीतून बाहेर पडा. एस म्हणजे साहेब, टी म्हणजे ताई, आणि डी म्हणजे दादा. आता या गुलामगिरीतून तुम्हाला बाहेर पडावे लागेल असं आवाहन पडळकर यांनी युवकांना केलं. नव्या लढाईत भटक्या विमुक्त समाजाला बरोबर घेऊया. पालावरच्या भटक्या विमुक्त बांधवांच्या सोबत दिवाळी साजरी करा असं आवाहनही पडळकर यांनी केलं. रामोशी समाजाची महाराष्ट्रात मोठी संख्या आहे, पण या समाजाचा एकही आमदार आजपर्यंत झाला नाही, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

या बातमीचा व्हिडिओ आपण आमच्या ‘ Changbhalanews’ या YouTube channel वर पाहू शकता.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close