सातारा जिल्ह्यात 133 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
172 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकाही होणार
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
जानेवारी 2023 ते माहे डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीद्वारे तसेच रिक्त जागांच्या पोट निवडणुकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांनी दिली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 133 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 16 ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यास सुरुवात होणार असून 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.
या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी 16 ते 20 ऑक्टोंबर सकाळी 11 ते दुपारी 3, नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 25 ऑक्टोंबर दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 25 ऑक्टोंबर दुपारी 3 वाजल्या नंतर, मतदानाचा दिनांक 5 नोव्हेंबर सकाळी 7.30 ते सायं.5.30 वाजेपर्यंत, मतमोजणी व निकाल घोषीत करण्याचा दिनांक 6 नाव्हेंबर 2023 व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक 9 नाव्हेंबर पर्यंत राहील.
जानेवारी 2023 ते माहे डिसेंबर 2023 या कालावधी मुदत संपणाऱ्या तसेच मागील निवडणुकीत एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त न झालेल्या व विघटीत झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा तपशील पुढीलप्रमाणे- सातारा तालुक्यातील 5, कराड तालुक्यातील 16, पाटण तालुक्यातील 26, कोरेगाव तालुक्यातील 13, वाई तालुक्यातील 16, महाबळेश्वर तालुक्यातील 17, जावली तालुक्यातील 24, फलटण तालुक्यातील 4, माण तालुक्यातील 4 व खटाव तालुक्यातील 8 अशा एकूण 133 ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
सातारा तालुक्यातील 27, कराड तालुक्यातील 9, पाटण तालुक्यातील 25, कोरेगाव तालुक्यातील 10, वाई तालुक्यातील 9, खंडाळा तालुक्यातील 5, महाबळेश्वर तालुक्यातील 30, जावली तालुक्यातील 33, फलटण तालुक्यातील 9, माण तालुक्यातील 3 व खटाव तालुक्यातील 12 अशा एकूण 172 ग्रामपंचायतींच्या 249 जागांसाठी पोट निवडणुकांचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.