चांगभलं ऑनलाइन | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने शाळांचे खाजगीकरण आणि नोकर्यांचे कंत्राटीकरण करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करा अशी मागणी दलित महासंघाचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलनाद्वारे करण्यात आली.दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे यांचे नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये सातारा जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते,बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राम दाभाडे, कराड तालुका अध्यक्ष जयवंत सकटे, खटाव तालुका अध्यक्ष शंकर तुपे, संपर्क प्रमुख बाळासाहेब चव्हाण, हरिभाऊ बल्लाळ, युवराज कांबळे, माणिक घाडगे,बापूराव सकट, विजय वायदंडे,बबन सकट, नवनाथ अवघडे , संतोष सकट आदिंनी सहभाग घेतला होता.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील ६२ हजार शाळांचे खाजगीकरण आणि नोकर्यांचे कंत्राटीकरण करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.हा निर्णय अनुसूचित जाती -जमाती,भटके- विमुक्त आणि गरीब- कष्टकरी वर्गातील शिक्षण घेणाऱ्या मुलांवर अन्याय करणारा आहे.
भारत देशामध्ये हजारो वर्षांपासून ज्या वर्गाला शिक्षणाची संधी नव्हती अशा वर्गातील स्त्री- पुरुषांसाठी महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे प्रयत्नातून शिक्षणाची संधी उपलब्ध झाली.कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाजसुधारकांमुळेच शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचली.त्यामुळे दलित, आदिवासी,भटके विमुक्त समाजातील मुले व मुली शिक्षण घेऊ लागले आहेत.अशा परिस्थितीमध्ये शासनाने शिक्षण आणि आरोग्य या बाबींमध्ये विशेष लक्ष देऊन काम करण्याची गरज असताना सरकारने शाळांचे खाजगीकरण आणि नोकर्यांचे कंत्राटीकरण करण्याचा निर्णय घेवून सर्व जाती धर्मातील गरीब व मागासलेल्या मुला- मुलींचेवर अन्यायकारक निर्णय घेतला आहे.
भारतीय संविधानाने शिक्षण हा मूलभूत अधिकार मानला आहे.असे असताना महाराष्ट्र सरकार आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे.ही गोष्ट निश्चित संतापजनक आहे.म्हणूनच दलित महासंघाच्या वतीने सरकारच्या या निर्णयाच्या धोरणाविरोधात महाधरणे आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला विनंती करण्यात येते की,आपण शाळांचे खाजगीकरण आणि नोकर्यांचे कंत्राटीकरण करण्याचा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा,अन्यथा दलित महासंघाच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे.