छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसाठी ९६.५० कोटींचा निधी मंजूर ; क्रीडा प्रेमींचा जल्लोष | डॉ. अतुल भोसले यांचे प्रयत्न – changbhalanews
मैदानराजकिय

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसाठी ९६.५० कोटींचा निधी मंजूर ; क्रीडा प्रेमींचा जल्लोष | डॉ. अतुल भोसले यांचे प्रयत्न

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी तब्बल ९६ कोटी ५० लक्ष रुपयांच्या निधीची घोषणा महायुती सरकारने केली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्टेडियमच्या विकासासाठी निधी मिळावा, म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याप्रमाणे ना. फडणवीस यांनी डॉ. अतुलबाबांच्या मागणीची दखल घेत, कराड येथील स्टेडियमच्या विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून ९६.५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय नगरविकास विभागाच्यावतीने नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे.

कराडमधील स्टेडियमच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध केल्याबद्दल डॉ. अतुलबाबा भोसले यांनी उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांची मुंबईत भेट घेत, त्यांचे कराडकरांच्यावतीने आभार मानले. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाल्याने कराडमधील क्रीडाप्रेमींचे स्वप्न साकार होणार आहे. लवकरच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा कायापालट होणार असून, क्रिडाप्रेमींना सर्वसोयींनियुक्त स्टेडियम उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या या निर्णयाचे कराडकरांमधून स्वागत होत आहे.

कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम शहराची शान आहे. याठिकाणी रणजी क्रिकेट सामनेही खेळले गेले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या स्टेडियमची दुरावस्था झाल्याने स्टेडियमचे नुतनीकरण व्हावे, अशी मागणी क्रीडाप्रेमींमधून होत होती. जानेवारी महिन्यात कराड येथे य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आले असता; डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्टेडियमच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्यावेळी ना. फडणवीस यांनीही लवकरच स्टेडियमचा विकास आराखडा तयार करुन, निधी देण्याची घोषणा या कार्यक्रमात केली होती.

त्यानुसार डॉ. भोसले यांनी तातडीने पावले उचलत, विकास आराखडा तयार करण्यासाठी कराड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत छ. शिवाजी महाराज स्टेडियमची पाहणी करुन, खेळाडू व क्रीडाप्रेमींशी चर्चा केली. तसेच त्यांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेत तयार केलेला स्टेडियमचा विकास आराखडा, फेब्रुवारीमध्ये ना. फडणवीस यांना सादर केला. सर्व प्रकारच्या खेळांसाठी उपयुक्त सोयीसुविधा, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा अंतर्भाव या विकास आराखड्यात करण्यात आला आहे. गेले जवळपास ६ महिने या निधीसाठी डॉ. भोसले शासन पातळीवर पाठपुरावा करत होते.

अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने स्टेडियमच्या विकासासाठी तब्बल ९६.५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी प्रथमच एवढा भरघोस निधी प्राप्त झाल्याबद्दल, कराडमधील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच या निधीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याबद्दल क्रीडाप्रेमींमधून डॉ. अतुलबाबा भोसले यांचे अभिनंदन केले जात आहे.

डॉ. अतुलबाबांनी कराडकरांच्यावतीने ना. फडणवीसांचे मानले आभार..

कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी डॉ. अतुलबाबा भोसले गेले ६ महिने प्रयत्नशील होते. यासाठी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. या मागणीची दखल घेत तब्बल ९६.५० कोटींचा निधी मंजूर झाल्याने, डॉ. भोसले यांनी आज मुंबईत ना. फडणवीस यांची त्यांच्या ‘सागर’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांना पेढ्यांचा बॉक्स देत ना. फडणवीस यांचे समस्त कराडकरांच्यावतीने आभार मानले.

स्टेडियमचा होणार कायापालट

नगरपरिषदांना वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकल्पाच्या खर्चाचा १०० टक्के हिस्सा राज्य शासनाकडे राहणार आहे. या निधीतून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा कायापालट होणार असून, तेथे अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात तालुकास्तरावर असणाऱ्या स्टेडियममध्ये सर्वात मोठे आणि सर्वप्रकारच्या सुविधा असणारे पहिले स्टेडियम म्हणून कराडचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ओळखले जाणार आहे.

शिवतीर्थावर दत्त चौकात लाडू वाटून जल्लोष….

कराडमधील छ. शिवाजी महाराज स्टेडियममध्ये १९८५ पासून ॲथलेटिक्सचे प्रशिक्षण चालू आहे. तसेच या स्टेडियमवर रणजी क्रिकेट सामनेही झाले आहेत. या स्टेडियममध्ये सराव करणाऱ्या अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. हे स्टेडियम केवळ शहरातीलच नव्हे; तर ग्रामीण भागातील खेळाडूंनाही उपयुक्त आहे. या स्टेडियमचा कायापालट करण्यासाठी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पुढाकार घेत, शासनाकडून तब्बल ९६.५० कोटींचा निधी मंजूर करवून आणल्याबद्दल शिवतीर्थ दत्त चौक येथे भाजपा कार्यकर्त्यांनी, क्रीडाप्रेमींनी , खेळाडूंनी एकमेकांना लाडू वाटप करून आनंदोत्सव , जल्लोष साजरा केला.

कराडचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सुसज्ज व सर्वसोयींनीयुक्त व्हावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस आले असता, त्यांच्याकडे याबाबतची मागणी केली. अवघ्या ६ महिन्यांतच त्यांनी आपला शब्द पूर्ण करत, स्टेडियमच्या विकासासाठी ९६.५० कोटींचा निधी मंजूर केला. या निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. अजित पवार यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. तसेच त्यांनी आमच्यावर असाच आशीर्वाद कायम ठेऊन, कराड शहराच्या विकासासाठी भविष्यातही भरघोस निधी उपलब्ध करुन द्यावा.
– डॉ. अतुलबाबा भोसले
प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजपा

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close