जनकल्याणच्या सरस्वती शैक्षणिक संकुलात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती शैक्षणिक संकुलामध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. उपाध्यक्ष तुकाराम चव्हाण, सचिव अनिल कुलकर्णी, संचालक डॉ.श्रीकृष्ण ढगे, दीपक कुलकर्णी, स्वाती भागवत यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सीए शिरीष गोडबोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, झेंडा गीत गायन झाले.
शैक्षणिक संकुलातील विद्यार्थांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणा व गायलेल्या सामूहिक देशभक्ती गीतांनी शालेय परिसर भारावून गेला. आर एस पीच्या विद्यार्थांनी संचलन करून उपस्थित अतिथी यांना मानवंदना दिली.
सीबीएसई शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘नन्हा मुन्ना राही हूँ…देश का सिपाही हूँ..’ या गीतावर अप्रतिम असे नृत्य सादर केले. सरस्वती शिशुवाटिका विभागातील विद्यार्थांनी श्री राम गीतावर अनोख्या पद्धतीने साधन कवायत केली. सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक विभागातील विद्यार्थांनी पमपम, घुंगुर काठी, डंबेल्स या साधनांसह साधन कवायत केली. शैक्षणिक संकुलातील सर्व विभागातील विद्यार्थांनी एकत्रितरित्या तालवाद्यांसह कवायत गीत गात गीताच्या आधारे बैठी कवायत सादर केली.
सरस्वती विद्यालय माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे, मल्लखांब, मल्लखांबावरील मनोरे, लेझिम व झांझ यांचे तालवाद्यसह उत्कृष्ट सादरीकरण केले. बाह्य परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या विविध स्पर्धेतील यशप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक मुख्याध्यापिका सोनाली जोशी यांनी केले.
७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळी चे प्रदर्शन या निमित्ताने भरविण्यात आले होते. संचालक सुनील मुंद्रावळे, नितीन गिजरे व श्रीपाद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी सादर कवायत व सर्व कार्यक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक विजय कुलकर्णी, मुख्याध्यापिका रुपाली तोडकर, शरयू माटे व दीपक पाटील, सुहास पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अनघा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास पालक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.